लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : नवीन प्रणालीत बायोमेट्रिक पद्धतीने पाॅस मशीनवर लाभार्थ्यांना अंगठ्याचे निशाण घेऊन धान्य वितरित केले जाते. या पाॅस मशीनवर लाभार्थी व दुकानदारांचे अंगठे वारंवार घेतले जात असल्याने काेराेना संक्रमणाची भीती बळावली आहे. त्यामुळे दुकानदारांना नाॅमिनी अधिकार देण्यात यावा, अशी मागणी कुही तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यामार्फत राज्य शासनाला पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
सध्या काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयांमध्ये खाटा, ऑक्सिजन व औषधांची कमतरता जाणवत आहे. खासगी आराेग्य सेवा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. रुग्णसंख्येसाेबतच मृत्युदरही वाढत आहे. त्यातच धान्य वाटप करताना पाॅस मशीनवर लाभार्थी व दुकानदारांचा अंगठा नाेंदवण्यास काही हरकत नाही. मात्र, हा प्रकार काेराेना संक्रमणवाढीस कारणीभूत ठरू शकताे. स्वस्त धान्य दुकानांमधून गरीब नागरिक धान्य विकत घेत असून, या प्रकारामुळे त्यांना काेराेनाची लागण हाेण्याची व त्यांचे कुटुंब संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काेराेना रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले जात असून, ग्रामीण भागात याची प्रभावी साेय नाही. त्यामुळे लाभार्थी संक्रमित झाल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब संक्रमित हाेण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी, शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करावा आणि काेराेना संक्रमण राेखण्यासाठी दुकानदारांना पाॅस मशीनवर नाॅमिनी अंगठा नाेंदवण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री, प्रधान सचिव यांच्यासह संबंधितांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आन्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय, १ मेपासून तहसील कार्यालयासमाेर आंदाेलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.