नागपूर : श्री गणेश मंदिर टेकडी पुरातन मंदिर असून ते १२ व्या शतकात हेमाद्री पंडितांनी बांधले आहे. या स्थळाला असलेले ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लक्षात घेता, या स्थळास ‘अ ’वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करण्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी एकमताने मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्याचे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी प्रशासनाला दिले. उपमहापौर गणेश पोकुलवार यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या स्थळाला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्यास मंदिराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होईल, यातून येथील विकास कामे होतील, अशी माहिती दटके यांनी दिली. येथील श्री गणेश मूर्ती २५० ते ३०० वर्षे पुरातन काळातील आहे. १८६६ मध्ये रेल्वे स्टेशनच्या कामासाठी टेकडीचे खोदकाम सुरू असताना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती निघाली होती. त्यामुळे ती पूजेतील मूर्ती असल्याचे स्पष्ट होते. कल्याण चालुक्याच्या नावाचा सीताबर्डी टेकडीवरील शिलालेख अजब बंगल्यात आहे. हा शिलालेख या देवळाची प्राचीनता सांगतो. १९६५ साली या मंदिराला ०.६७ एकर जागा संरक्षण विभागाने दिली. या जागेवर १९७५ साली नवीन देऊ ळ बांधण्यात आले. विदर्भातील अष्टविनायकात या मंदिराचा समावेश होतो.श्री गणेश मंदिर टेकडी हे नागपूरचे आराध्य दैवत आहे. वैदर्भीयांचे श्रद्धास्थान आहे. मासिक संकष्टी चतुर्थीला लाखो भाविक येथे येतात. अंगारिका तिळी चतुर्थीला मोठी यात्रा भरते. गणेशोत्सवादरम्यान येथे दररोज ५० हजार भाविक दर्शनासाठी येतात. दुर्गा उत्सवातही भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याची मागणी प्रस्तावातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
श्री गणेश मंदिर टेकडीला ‘अ’ दर्जा द्या
By admin | Published: October 27, 2015 3:47 AM