नागपूर : वर्धा येथील विद्यार्थिनी नयन चौके हिला माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला. त्यामुळे विद्यार्थिनीला दिलासा मिळाला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नयनच्या वडील व भावाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माना-अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. असे असताना, पडताळणी समितीने नयनला अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. राज्यघटना लागू होण्यापूर्वीच्या दस्तऐवजांमध्ये नयनच्या काही नातेवाईकांची जात माने, मान्या, माना-कू अशी नमूद करण्यात आली आहे. तसेच, वडील व भावाला वैधता प्रमाणपत्र देताना दक्षता कक्षाकडून चौकशी करण्यात आली नाही अशी कारणे समितीच्या विवादित निर्णयात देण्यात आली होती. उच्च न्यायालयाने कायदेशीर बाबी लक्षात घेता समितीचा निर्णय अवैध ठरवून रद्द केला. तसेच, हा आदेश दिला.