किशोर वंजारी । लोकमत न्यूज नेटवर्कनेर (यवतमाळ) : इतनी शक्ती हमे देना दाता... हे गाण विद्यार्थी जीवनात प्रत्येकाने ऐकले, म्हटलेही. अनेकांना संकटसमयी प्रेरणा देणाऱ्या या गाण्याची गायिका मात्र आज स्वत:च परिस्थितीपुढे हतबल झाली आहे. पुष्पा पागधरे हे तिचे नावही आजच्या पिढीला ठाऊक नाही. आज ती साध्या घरासाठी शासनाला हाक देतेय. अन् शासन निगरगट्टपणे नकार देतेय.. मात्र, उतारवयात उपेक्षा भोगणाऱ्या गायिकेने तिच्या गाण्याप्रमाणेच ‘मन विश्वास कमजोर हो ना’ अशी उमेद कायम राखली आहे.नेर येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ‘स्नेहआधार’ शाळा सुरू करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटनाला पुष्पाताई आल्या होत्या. यावेळी आपल्या जीवनाचे विविध पैलू त्यांनी ‘लोकमत’पुढे मोकळेपणाने उघड केले. चिरतरूण गाणं गाणाऱ्या पुष्पा पागधरे आज वयोवृद्ध आहेत. तिच्या वाट्याला दारिद्र्यच आले. राहायला घर नाही. अख्खे आयुष्य गाण्यासाठी वेचणाऱ्या पुष्पाताईच्या वेदना ऐकल्यावर पापण्या ओल्या झाल्याशिवाय राहात नाहीत. पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे १५ मार्च १९४३ ला पुष्पातार्इंचा जन्म झाला. चंद्रकांत पागधरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वडील भजन गायचे. त्यामुळे त्यांनाही गाण्याचा छंद लागला. आर.डी.बेंद्रे यांनी पुष्पातार्इंना विनामूल्य संगीत शिकविले. संगीतकार अब्दुल रहमान खॉ यांनी गायनाचे धडे दिले. ते प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचे गुरू होते. पुष्पातार्इंनी इंदूर, गोरखपूर, जम्मू, दिल्ली, लखनऊ, मुंबई, रायपूर, ग्वाल्हेर, रांची, पाटना या आकाशवाणी केंद्रांवर गायन केले. आकाशवाणीनेच आपल्याला खरी ओळख दिल्याचे पुष्पाताई म्हणाल्या. राम कदम, सुधीर फडके, पंडित यशवंत, अशोक पत्की, राम लक्ष्मण, बाळ परसुले यासारख्या संगीतकारांसोबत त्यांनी ७०० गाणी म्हटली. ओ.पी.नय्यर यांनी ‘खुन का बदला’, बिन मा के बच्चे’ ‘मुकद्दर की बात’ या चित्रपटांसाठी पुष्पाताईकडून गायन करून घेतले. महाराष्ट्र शासनाने त्यांना दोनदा पुरस्कार दिले. याशिवाय अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला आहे. मात्र, गायनासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या या माऊलीला स्वत:चे घर बनविता आले नाही. उतारवयात त्यांनी शासनाकडे घराची मागणी केली. पण शासनाने दुर्लक्ष केले. त्यांच्यावर मुंबईच्या फुटपाथवर राहण्याची वेळ आली असती. पण उल्हासनगरातील हसन नामक मानलेल्या भावाने आपल्या घरात पुष्पातार्इंना आसरा दिला. ‘आजच्या भन्नाट गाण्यापेक्षा जुनी गाणी बरी होती. तेव्हा व्यावसायिक स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती’ असे मत पुष्पातार्इंनी व्यक्त केले. ‘इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना’ १९८६ च्या ‘अंकुश’ चित्रपटात प्रदर्शित झाले अन् सुपरहिट झाले. पुष्पाताई पागधरे व सुषमा श्रेष्ठ या दोघींनी गायलेले हे गीत आजही अनेकांचे प्रेरणागीत आहे. मात्र, या दिग्गज गायिकेलाच आज घरासाठी शासनाकडे पदर पसरावा लागतोय. आश्चर्य म्हणजे, शासन याबाबतीत गंभीर नाही. दादांना पाहिजे होत्या लतादिदी.. मिळाल्या पुष्पाताई!दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ चित्रपटातून त्यांच्या पार्श्वगायनाला सुरूवात झाली. नंतर बंगाली, भोजपुरी, मराठी, हिंदी, मोरिया भाषेत विविधी गाण्यांना त्यांनी स्वर दिला. ‘सोंगाड्या’च्या गाण्यासाठी दादा कोंडके यांना लता मंगेशकर हव्या होत्या. पण त्यांची तारीख मिळत नसल्याने ट्रायल बेसवर पुष्पा पागधरे यांना संधी देण्यात आली. त्यांनी या संधीचे सोने केले. दादा कोंडके यांना हा आवाज इतका आवडला की, त्यांनी डबिंग न करता पुष्पाताईच्या आवाजात ‘सोंगाड्या’ तयार केला. या चित्रपटातील ‘राया मला पावसात नेऊ नका’ हे गीत खूप गाजले.