लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भेट कशी असावी, कधीही सुटण्यासारखी अन् भेटवस्तू कशी असावी तर तुझ्या अस्तित्वासारखी... हा ‘लव्ह इफेक्ट’चा मामला. वर्तमानातील हा इफेक्ट कॉफी डेट इतका क्षणभंगुर असला तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा. ‘व्हॅलेंटाईन वीक’च्या पार्श्वभूमीवर हा इफेक्ट अधिक बहरून निघतो. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे नंतर अतिशय लडिवाळता व्यक्त करणारा दिवस म्हणजे ‘टेडी डे’. बुधवारी हा दिवस साजरा होणार आहे. व्हॅलेंटाईन वीकमधला हा चौथा दिवस साजरा करण्यासाठी नागपूरकर युगुल भन्नाट आयडिया लढवत आहेत.
‘टेडीबिअर’ आज प्रत्येकाच्या घरात शिरला आहे. कापसाचा भरणा अन् वरून मऊ मऊ कापडाचे आवरण असलेला हा टेडी प्रत्येकाला हवा आहे. विशेषत: टिनएजर मुलींना तर त्याचे भारी वेड. रस्त्यावर, दुकानात कुत्र्या, मांजराचा, अस्वलाचा, वाघोबाचा व अन्य कुठल्याही प्राण्याचा भास देणारा हा टेडी म्हणजे मुलींचा जीव की प्राण. हीच बाब प्रेमवेड्या युवकांनी हेरली आणि भावी प्रेयसीला भाळण्यासाठी हक्काची आयडिया मिळाली. रोझ डेला प्रतिसाद मिळाला नाही, प्रपोज डेला अपेक्षित उत्तर मिळाले नाही, चॉकलेट डेला अजूही प्रतीक्षाच पदरी पडली तर टेडी डे हमखास यश पदरात पाडेल, असा आशावाद मुलांचा असतो. ही झाली प्रभाव पाडण्याची बाब. मात्र, जे ऑलरेडी प्रेमात आहेत आणि भावी आयुष्याचा चित्रपट रेखाटत आहेत त्यांच्यात तर टेडी हा एकमेकांच्या अस्तित्वाचा दुवाच ठरतो. हल्ली तर मुलेदेखील या टेडीच्या प्रेमात पडत असलेली दिसतात. ती आपल्या घरी, मी माझ्या घरी, हा टेडीच तुझ्या-माझ्या रिलेशनचा साक्षीदार, अशा भावना आजकाल मुलांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
भेटवस्तूने अंतर पडू नये
प्रेम ही कल्पनाच मुळी आल्हाद निर्माण करणारी. सच्च्या प्रेमात कसलाच अडसर नसतो. भेटवस्तू दिल्या काय, नाही दिल्या काय... प्रेम ही भावनाच विधात्याने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. टेडी खरेदी करण्यास पैसा नसेल तर हिरमुसून जाऊ नका किंवा अपेक्षित व्यक्तीने टेडी दिला नाही तर नाराज होऊ नका. आपण एकमेकांचे ‘टेडी मॅडी’ आहोत, असे खुशाल सांगा आणि आनंद व्यक्त करा.
..........