शिक्षण विभागाचे मुख्याध्यापकांना आदेश : लोकमतच्या लढ्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व्हावे, यासाठी गेल्या महिनाभरापासून लोकमतने सातत्याने हा विषय लावून धरला आहे. अखेर उशिरा का होईना महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना १४ आॅगस्टपर्यत सर्व विद्यार्थ्याना गणवेश वाटपाचे आदेश दिले आहे. याबाबतचा अहवाल दररोज सादर करावा, असेही यात नमूद केले आहे. मात्र या आदेशाने विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा होणारी गणवेशाची रक्कम कशी मिळणार याचे उत्तर मिळालेले नाही. हा प्रश्न कसा सोडविणार याकडे लक्ष लागले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व्हावे, यासाठी प्रशासनाने नियोजन केले होते. मुख्याध्यापकांच्या खात्यात निधी वळता करण्यात आला आहे. परंतु अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झालेले नाही. ही बाब लोकमतने निदर्शनास आणली होती. याची दखल घेत १४ आॅगस्टपर्यत गणवेश वाटप करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी सोमवारी काढले आहे. विद्यार्थ्याना गणवेश वाटप करणे अनिवार्य आहे. १०० टक्के विद्यार्थ्याना गणवेश मिळाला पाहिजे. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी पालकांशी संपर्क साधावा. तसेच याबाबतचा प्रगती अहवाल दररोज झोनच्या शाळा निरीक्षकांना सादर करावयाचा आहे. यासोबतच महापालिका शाळांतील पटसंख्या वाढावी यासाठी उपायोजना करावयाच्या आहेत. महापालिका शाळांत केजी-१, केजी-२ चे वर्ग सुरू करण्याबाबत आधीच सूचना केलेल्या आहे. त्यानुसार नर्सरीत २० विद्यार्थी, केजी-१ व केजी-२ मध्ये प्रत्येकी २० विद्यार्थी तसेच इयत्ता पहिलीत ३० विद्यार्थ्यांची पटनोंदणी होणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबी कालमर्यादेत शिक्षकांच्या सहकार्याने पूर्ण करावयाच्या आहेत. यात हयगय केल्यास निलंबन कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
१४ आॅगस्टपूर्वी गणवेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:56 AM