लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : कोरोनाच्या काळात भीतीपाेटी आप्तस्वकीय दूर झालेत. अशावेळी अत्यंत विदारक परिस्थितीत आम्ही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर औषधोपचार केलेत. शेकडो रुग्ण कोरोनामुक्त झालेत. गरज असताना आम्हीच कोविड सेंटर सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला. आता आम्हास कार्यमुक्त केल्याने दोनवेळच्या भाकरीची चिंता सतावत आहे. तरीही आम्ही खंबीरपणे सोबतीला आहोत. ज्यावेळी शासकीय सेवेत रिक्त जागांची भरती होईल, त्यावेळेस कोविड सेंटरमध्ये कार्यरत सर्व जणांना प्राथमिकता द्यावी, अशी कळकळीची मागणी कंत्राटी मनुष्यबळ म्हणून कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या परिचारिकांनी केली.
उमरेड कोविड सेंटरमध्ये एकूण २२ मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने कोविड सेंटरमध्ये कर्तव्यावर होते. त्या सर्वांना शासनाच्या आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात आले. यावरून अनेकांनी संताप व्यक्त केला. या मनुष्यबळांपैकी उमरेड सेंटरमध्ये तब्बल १२ परिचारिका कर्तव्यावर होत्या. त्यांनाही कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले. यापैकी बहुतांश परिचारिका शेतमजूर, शेतकरी कुटुंबातील अत्यंत गरीब अवस्थेत जीवन जगणाऱ्या आहेत. परिश्रम, मेहनत आणि प्रामाणिकतेच्या बळावर गावखेड्यातून आम्ही शहरात आलोत. अशावेळी निदान शासनाने आमचा विचार नक्की करावा, अशी भावना करिश्मा कांडरकर, शीतल तामगाडगे, अंजली वानखेडे, काजल दिवे, ज्ञानेश्वरी बळवाईक, सुकेश्नी पाटील, नीलिमा रोडे, मोनाली गिरडे, नम्रता कुबडे, पायल नागलवाडे, पूर्वली धोपटे, प्रभा तायडे, ज्योती बावणे आदींनी केली.
अनेकांचे कुटुंब दारिद्र्य अवस्थेत आहेत. कंत्राटी मानधनातून आम्हास आर्थिक बळ मिळत होते. आम्ही कुठेही कामचुकारपणा केला नाही. कोरोना रुग्णांची मनोभावे सेवाच केली आहे. आमच्या कामाची अधिकारी तथा लोकप्रतिनिधींनीही प्रशंसाच केली, असल्याच्या भावनासुद्धा या परिचारिकांनी व्यक्त केल्या. आम्हाला पुन्हा संकटाच्या वेळेस बोलावल्यास आम्ही सज्ज आहोत, अशा शब्दात या परिचारिकांनी तयारी दर्शविली. एकीकडे त्यांना कार्यमुक्त केल्याने संताप व्यक्त होत असून, सोबतच त्यांच्या कार्याचे कौतुकसुद्धा होत आहे. केवळ कौतुकाने आमचे पोट भरत नाही, अशाही प्रतिक्रिया या परिचारिकांच्या आहेत.
....
एक महिन्याचे मानधन
उमरेड कोविड सेंटरमधील २२ कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन अद्याप मिळाले नाही. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर यांच्याकडे विचारणा केली असता, लवकरच मानधन देण्यात येईल, असे ते प्रस्तुत प्रतिनिधीशी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलले.