लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता आहे. वाहन देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी २५ विभागाप्रमुखांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. यासंदर्भाती प्रक्रिया विभागाने सुरू केल्याची माहिती आहे.निवडणुकीदरम्यान होणाऱ्या प्रचार सभेवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर कामासाठी निवडणूक विभागाला १२०० वाहनांची आवश्यक आहे. यात ६०० जीप, ४५० बस, १०० ट्रक, २४ अॅम्बुलेंस तर २४ अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे. यात काही वाहने कंत्राटी घेण्यात येणार असून काही वाहने शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. २५० वाहने हे शासकीय विभागांकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी विभागप्रमुखांना पत्र पाठविण्यात आले. मात्र आतापर्यंत फक्त १०० च्या जवळपासच वाहने प्रशासनाकडे जमा झाली आहेत. विभागाकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे निवडणूक प्रशासनाकडून जवळपास १०० विभागांना नोटीस पाठविणार असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारपासून वाहन जप्तीची मोहीम सुरू करण्यात येणार होती. मात्र काही विभागांच्या सूचनेवरून मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत ७५ च्या जवळपासच वाहने विभागाला प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने आता प्रशासनाने थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जवळपास २५ विभागाप्रमुखांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात फाईल तयार करण्यात आली आहे.वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने जप्तीची कारवाई निवडणूक प्रशासनाकडून गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने एक पथक तयार केले असून यात ट्राफिक, आरटीओ तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा समोवश असल्याची माहिती आहे.सूत्रानुसार शासकीय विभागांकडून वाहन देण्यास नेहमीच टाळाटाळ होत असते. दरवेळी अशाप्रकारे फाईल तयार केली जाते. गुन्हे दाखल करण्यात येतील अशी नोटीस बजावली जाते. परंतु कारवाई कधी होत नाही. त्यापूर्वीच वाहने जमा होत असतात, असा अनुभव आहे.