दयानंद पाईकराव, नागपूर : हॉटेलच्या नावाची लिंक देऊन रेटींग केल्यास प्रती रेटींग ५० रुपये देण्याचे आमीष दाखवून सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीची १७ लाख ६३ हजार ५७० रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ते २५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली.
मयुर मोरेश्वर सावरबांधे (३०, रा. शिवसुंदरनगर, दिघोरी दहन घाटाजवळ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयुर हे आपल्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर सन मार्केटिंग ग्रुपमध्ये त्यांना जॉईन केल्याचा मॅसेज आला. त्यात हॉटेल नावाची लिंक देऊन रेटींग केल्यास प्रति रेटींग ५० रुपये मिळतील असे नमूद केले होते. त्यामुळे ते दिलेल्या टेलिग्राम लिंकवर ॲड झाले. त्यांनी २ हजार रुपये अकाऊंटमध्ये जमा करून टास्क पूर्ण केला. त्यावर आरोपीने त्यांना नफ्यासह २८०० रुपये पाठवून नफा होत असल्याचे दाखविले. सुरुवातीला मयुर यांनी वेगवेगळ्या अकाऊंटवर छोटी रक्कम गुंतविली.
आरोपीने त्यांना खात्यात वाढीव रक्कम पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मयुर यांनी वेगवेगळ्या खात्यावर १६ लाख ६३ हजार ५७० रुपये पाठविले. त्यानंतर मयुर यांनी रक्कम डिपॉझीट करण्यास मनाई करून रक्कम परत मागितली. परंतु आरोपीने त्यांना रक्कम परत न करता त्यांचा विश्वासघात करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केली. मयुर यांनी दिलेल्या तक्रारीवरू वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, सहकलम ६६ (ड) आयटी ॲक्टनुसार नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.