लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चक्कर आल्याचा बहाणा करून शहरातील एका लॉटरी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने मालकाचे ३४ लाख रुपये लंपास केले. ही घटना रेशीमबाग चौकात घडली. कोतवाली पोलिसांनी आरोपी नसीम मिर्जा बेग (४५) रा. भूतिया दरवाजा, महाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी क्वॉर्टर येथील रहिवासी असलेले सिराज शेख यांच्याकडे नसीम अनेक दिवसांपासून काम करतो. तो शेख यांचा अतिशय विश्वासू होता. शेख यांच्या कुटुंबात ३० डिसेंबर रोजी लग्न आहे. लग्नाच्या खर्चासाठी शेख यांनी व्यवसायातील रक्कम घरी ठेवली होती. सिराज लग्नाच्या खरेदीसाठी परिवारासह कोलकाताला गेले. यापूर्वी त्यांनी ३४ लाख ५१ हजार १०० रुपयांची रक्कम त्यांचे मित्र इतवारी येथील आकाश जैन यांच्याकडे सांभाळून ठेवायला दिली. जैन यांना आवश्यक कामाने बाहेर जावे लागल्याने त्यांनी शेख यांना त्यांची रक्कम परत घेऊन जाण्यास सांगितले. शेख यांनी २८ नोव्हेंबर रोजी नसीमला पैसे घेण्यासाठी जैन यांच्याकडे पाठवले. त्यांनी जैन यांच्याकडून पैसे घेऊन आपल्या भावाला ती रक्कम द्यायला सांगितले. नसीनमे जैन यांच्याकडून पैसे घेतले, परंतु शेख यांच्या भावाला ती रक्कम दिली नाही. शेखने फोन केला असता एक-दोन दिवसात येतो, असे सांगितले. यानंतरही नसीम आला नाही. तेव्हा शेख यांना संशय आला. ते नसीमकडे गेले. नसीमने त्यांना सांगितले की, २८ नोव्हेबंर रोजी तो पैसे घेऊन परत येत असताना रेशीमबाग चौकात त्याला चक्कर आली. परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात पोहोचविले. यानंतर त्यांच्या पुतण्यांची बॅग उघडली असता त्यात केवळ १० हजार रुपये होते. ३४ लाख ४१ हजार १०० रुपये गायब होते. नसीमची गोष्ट ऐकून शेखला धक्काच बसला. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यापासून नसीम गायब आहे.
चक्करच्या बहाण्याने नोकराकडून ३४ लाख रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:38 PM
चक्कर आल्याचा बहाणा करून शहरातील एका लॉटरी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने मालकाचे ३४ लाख रुपये लंपास केले. ही घटना रेशीमबाग चौकात घडली. कोतवाली पोलिसांनी आरोपी नसीम मिर्जा बेग (४५) रा. भूतिया दरवाजा, महाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देनागपुरात लॉटरी व्यापाऱ्याला फसवले