लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लुटमारीच्या गुन्ह्यात पाच वर्षांपूर्वीच निर्दोष सुटलेल्या व्यक्तीला फरार घोषित करून त्याला अटक केल्याची कामगिरी बजावल्याचा पोलिसांचा दावा फोल ठरला. सोबतच त्या व्यक्तीसोबत फोटो सेशन करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची चमकोगिरीही सोमवारी पोलिसांना अडचणीत आणणारी ठरली.
राजकुमार अंबादे (वय ५५, रा. जरीपटका) हा २००० सालच्या लुटमारीच्या गुन्ह्यातील आरोपी होता. अनेक वर्षे तो तारखेवर हजर राहत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणात २०१६ मध्ये न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. मात्र पोलिसांच्या रेकॉर्डवर तो फरारच होता. सोमवारी तो जरीपटक्यातील घरी आढळल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. २१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केल्याची प्रेसनोट काढून तो फोटोसह प्रसिद्धीलाही दिली. दरम्यान, ज्या गुन्ह्यात फरार म्हणून राजकुमारला अटक करण्यात आली. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केल्याचे अंबादेच्या नातेवाइकांनी कागदपत्रांसह जरीपटका पोलिसांना पटवून दिले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाची चमकोगिरी सर्वत्र चर्चेला आली. विशेष म्हणजे, आपली गंभीर चूक लक्षात आल्यानंतर गुन्हे शाखेने सोमवारी रात्री सुधारित पत्रक काढून ‘ते प्रकरण तसे नाही’ अशा आशयाचा खुलासाही दिला आहे.
----
नागपुरातील गुन्हेगारी ठेचून काढा, कोणत्याही गुन्हेगाराची गय करायची नाही, मात्र सर्वसामान्यांना त्रास द्यायचा नाही. चमकोगिरी अजिबात करायची नाही, असे कडक निर्देश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सर्व पोलिसांना दिले आहे. बार लुटणाऱ्या अल्पवयीन आरोपींची सार्वजनिक धिंड काढून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकाराची अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणात तत्कालीन ठाणेदारासह पाच जणांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले होते, हे विशेष. सध्या पोलीस आयुक्त बाहेर आहेत. त्यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहचू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.