लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील प्रतिभावान धावपटू वैभव अंधारे याने द. आफ्रिकेतील कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये यशस्वी कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचा नावलौकिक उंचावला आहे. ८६.७३ किलोमीटर अंतराची ही वार्षिक मॅरेथॉन द. आफ्रिकेच्या क्वाजुलू नताळ ते दरबन आणि पीटरमेरिट्झबर्ग या शहरांदरम्यान आयोजित केली जाते. जगातील सर्वांत लांब अंतराची तसेच सर्वांत प्राचीन मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेची ख्याती आहे. नागपूरचा अॅथ्लिट तसेच रेस अॅक्रॉस अमेरिकेतील स्पर्धक डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात सराव करणारा वैभव अंधारे याने प्रो हेल्थ फाऊंडेशनच्या ‘ माईल्स अ मिलर्स’ या कार्यक्रमांतर्गत मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. वैभव हा नागपूर-१० के मॅरेथॉनसह अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत असतो. स्थानिक आॅरेंज सिटी रनर्स सोसायटीचा तो सदस्य आहे. ४ जून रोजी आयोजित कॉमरेड्स मॅरेथॉनमध्ये जगातील अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी हजेरी लावली. नागपूरच्या चार धावपटूंचा यात समावेश होता. सर्व चारही स्पर्धक अमित थत्ते, डॉ. संजय जायस्वाल आणि राजेंद्र जायस्वाल हे डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात सराव करीत आहेत.यापैकी वैभव अंधारे हा एकमेव धावपटू शर्यत पूर्ण करण्यात यशस्वी ठरला.अन्य तिन्ही धावपटू ७९ किलोमीटरचा (फायनल कट आॅफ) पहिला टप्पा गाठण्यात दोन मिनिटांच्या फरकाने चुकले. मध्य भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चारही धावपटूंची कामगिरी या क्षेत्रातील अन्य धावपटूंना प्रोत्साहित करणारी ठरणार आहे.
नागपूरच्या वैभव अंधारेची ‘कॉमरेड्स मॅरेथान’मध्ये चमक
By admin | Published: June 08, 2017 2:54 AM