लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी लेखकांना नोबेल मिळावे, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे सातत्याने विचारणाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. जागतिक पटावरती प्रचंड राजकीय आणि आर्थिक सत्ता असेल तरच तुमच्या भाषेकडे, वाङ्मयाकडे लक्ष वेधले जाते आणि त्यातील जे काही बरे-वाईट आहे ते स्वीकारले जाते. मात्र ‘आमच्याकडे यातले काहीच नाही आणि आम्हाला नोबेल पाहिजे, कसे शक्य आहे? कोण विचारतो मराठी भाषेला आणि कशाला हवा अभिजात भाषेचा दर्जा?’, असा खोचक सवाल प्रा. एलकुंचवार यांनी केला.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने देण्यात येणारा प्रा. राम शेवाळकर भाषाव्रती पुरस्कार भाषाविषयक क्षेत्रात गेल्या ५० पेक्षा जास्त वर्षांपासून कार्य करणारे अभ्यासक आणि संपादक प्रा. प्र. ना. परांजपे आणि दिवाकर मोहनी यांना प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या देवधर, कार्यवाह इंद्रजित ओरके, विलास मानेकर तसेच भाष्यकार म्हणून डॉ. विजया देव आणि सुरेखा देवघरे उपस्थित होत्या. प्रा. महेश एलकुंचवार यांनी आपल्या चिरपरिचित शैलीपेक्षा वेगळे आणि अत्यंत खुशखुशीत शैलीत संवाद साधला. काही नवलेखकांच्या साहित्याचा उल्लेख करीत आपलीच मराठी खराब झाल्यासारखी वाटत असल्याची कोटी केली. अनावश्यक प्रतिभाविलास करताना आपण इतक्या अशुद्ध, वाईट, ढिसाळ व बेजबाबदारपणाने लिहितो, असे यांना जाणवत नाही. आपली भाषा चांगली लिहिता व बोलता न येणे, हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे कुणालाही वाटत नाही. त्यामुळे येणाऱ्या १५-२० वर्षांनी आताची मराठी ओळखीचीच राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली.प्रा. एलकुंचवार यांनी वर्गमित्र असलेले दिवाकर मोहनी तसेच प्रा. प्र. ना. परांजपे यांच्याविषयीची मैत्री मनोगत अतिशय खेळकरपणाने मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला. दररोज भेटलोच आणि बोललोच पाहिजे, म्हणजे मैत्री असते, असे नव्हे. जगात काहीच नष्ट होत नाही. उद्या आम्ही नसलो तरी आमच्या मैत्रीचे घटीत कुठेतरी व्यक्त होईल, कुणालातरी स्पर्श करेल, असे भावनामय मनोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी डॉ. विद्या देवधर यांनी, केवळ आपली भाषा करून चालणार नाही तर विविध भाषांचे ज्ञान अंगिकारण्याची गरज व्यक्त केली. भाषेसाठी व्रतस्थपणे कार्य करणाऱ्यांप्रति आपले काही देणे आहे, यामुळे या दोन महनीय व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करीत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. विजया देव यांनी प्रा. परांजपे आणि सुरेखा देवघरे यांनी मोहनी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. संचालन विवेक अलोणी व सुषमा मुलमुले यांनी केले. साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी आभार मानले.
राजकीय व आर्थिक सत्तेशिवाय भाषेची जागतिक गणना अशक्य : महेश एलकुंचवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:11 AM
मराठी लेखकांना नोबेल मिळावे, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे सातत्याने विचारणाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. जागतिक पटावरती प्रचंड राजकीय आणि आर्थिक सत्ता असेल तरच तुमच्या भाषेकडे, वाङ्मयाकडे लक्ष वेधले जाते आणि त्यातील जे काही बरे-वाईट आहे ते स्वीकारले जाते. मात्र ‘आमच्याकडे यातले काहीच नाही आणि आम्हाला नोबेल पाहिजे, कसे शक्य आहे? कोण विचारतो मराठी भाषेला आणि कशाला हवा अभिजात भाषेचा दर्जा?’, असा खोचक सवाल प्रा. एलकुंचवार यांनी केला.
ठळक मुद्देमोहनी व परांजपे यांना भाषाव्रती पुरस्कार प्रदान