निशांत वानखेडे
नागपूर : अमेरिकन अंतराळ संशाेधन संस्था नासाच्या वैज्ञानिकांनी कृषी क्षेत्राबाबत एक चिंताजनक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार येत्या दशकभरातच ग्लाेबल वार्मिंगचे परिणाम कृषी क्षेत्रावर दिसायला लागतील. जगभरात महत्त्वाचे पीक म्हणून गणना हाेणाऱ्या मक्याचे उत्पादन २०३० पर्यंत तब्बल २० टक्क्यांनी घटणार, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या काळात गव्हाचे उत्पादन १७ टक्क्यांनी वाढेल, असेही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
मका हे जगभरात महत्त्वाचे अन्नधान्य मानले जाते. सध्या तापमान वाढीचे सत्र असेच कायम राहिले तर दशकभरात मक्याचे उत्पादन कमालीचे घटणार आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी जगभरात अपेक्षित तापमान वाढ, पावसाच्या पॅटर्नमध्ये हाेणारे बदल आणि वातावरणात ग्रीन हाऊस गॅसेसचे वाढते काॅन्सन्ट्रेशन यांचा कॉम्प्युटर माॅडेलिंगद्वारे सुसूत्रित अभ्यास करून हा अहवाल सादर केला आहे.
सध्या अमेरिका, ब्राझील आणि चीन हे जगातील सर्वाधिक मका उत्पादक देश आहेत. याशिवाय भारतासह मध्य आशियामध्येही मक्याचे उत्पादन कमालीचे वाढले आहे. मात्र हवामान बदलाने धाेक्याची घंटा वाजविली आहे. अभ्यास माॅडेलनुसार सध्या उत्पादन करणाऱ्या प्रदेशातील तापमान वाढणार असल्याने उत्पादन खाली घसरेल. वैज्ञानिकांच्या मते, सर्व देश जागतिक तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशावेळी हवामान बदलाच्या आशावादी परिस्थितीतही जगभरातील कृषी क्षेत्राला हवामान बदलाचा सामना करावा लागताे आहे. जागतिक अन्न व्यवस्थेच्या परस्परसंबंधामुळे, एका प्रदेशात हाेणारे परिणाम जगभरात जाणवतात.
- गव्हाचे उत्पादन १७ टक्क्यांनी वाढेल
या अहवालामधील धक्कादायक पण सकारात्मक बाब म्हणजे जगात दुसऱ्या क्रमांकावर उत्पादन हाेणाऱ्या गव्हाचे उत्पादन १७ टक्क्यांनी वाढेल, असेही नमूद करण्यात आले आहे. येणाऱ्या उष्ण जगात गव्हाची उत्पादकता वाढेल, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला.
- भाताचे उत्पादन वाढेल?
भात पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. तापमानात वाढ झाली की पाऊस पडण्याचीही शक्यता वाढते. त्यामुळे भात पिकाला अनुकूल असलेली परिस्थिती निर्माण हाेईल व भाताचे उत्पादन वाढेल, असा दावा वैज्ञानिकांद्वारे करण्यात येत आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान हाेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
- अभ्यास माॅडेलचे सूत्र काय?
संशाेधकांनी पीक वर्तनाच्या अभ्यासावरून दोन प्रकारचे मॉडेल वापरले.
- पहिले, सन २१०० पर्यंत पृथ्वीचे हवामान वेगवेगळ्या संभाव्य ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनाला कसा प्रतिसाद देईल.
- संशाेधकांनी तापमान बदल, पर्जन्यमान आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या काॅन्सन्ट्रेशनवरही लक्ष केंद्रित केले.
- हे बदल झाडांसाठी सर्वात आवश्यक फाेटाेसिन्थेसिस प्रक्रियेवर व त्यांच्या वाढीवर परिणाम करतील.
- जगात ठिकठिकाणी वेगवेगळ्या पिकांवर दिवसागणिक, वर्षागणिक आणि दशकांमध्ये हाेणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे.