- निशांत वानखेडेनागपूर : संचिता प्रियदर्शी सोनवाने ही ११ व्या वर्गाची विद्यार्थिनी. दहावीच्या प्रथम सेमिस्टरची परीक्षा आणि याच काळात घरातील एका नातेवाईकाच्या निधनाने एक निराशेची भावना व मनात मोठा तणाव निर्माण झाला होता. निराशा घालविण्यासाठी आईकडचे आजीआजोबा तिला घेऊन पर्यटनाला गेले. तथागत बुद्धाच्या अस्तित्वाच्या खुणा दर्शविणारे बौद्ध स्थळांचे वैभव पाहून ती खरोखर भारावून गेली. मनातील निराशा दूर झाली होती, पण या स्थळांची हुरहूर तिला लागली होती. मनातील भावना लोकांसमोर मांडाव्या म्हणून या बौद्ध स्थळांचे वैभव तिने शब्दबद्ध केले आणि संचिताचे पहिले पुस्तक आकाराला आले.दीक्षाभूमीवर आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्ध महोत्सवाच्या वेळी संचिताने लिहिलेल्या ‘बुद्धिस्ट पिलीग्रीमेज थ्रु आईज ऑफ टिनेज’ या पुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते विमोचन झाले. हा तिच्यासाठी अभिमानाचा क्षण. यावेळी लोकमतशी बोलताना संचिताने मनातील भावना मांडल्या. त्यावेळी सारनाथ, श्रावस्ती, कुशीनारा, नालंदा, वैशाली, ग्रीद्धकुट्ट, बौद्धगया, युपीचे पिपरवा ही स्थळ तिने पालथी घातली होती.या सर्व स्थळांवर विदेशी पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे दिसले. तेही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या बौद्ध वारसांचा सन्मान करीत असल्याचे तिला जाणवले. मात्र यात भारतीयांची संख्या अतिशय कमी होती आणि शिस्तीचा अभाव होता. ही बाब मनाला अस्वस्थ करीत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे कधी काळी असलेले बुद्धाचे अस्तित्व दर्शविणारा हा वारसा आकर्षक रुपात विशेषत: तरुणांपर्यंत पोहचावा या उद्देशाने हे पुस्तक लिहिल्याचे ती सांगते. आपण संरक्षित ठेवला तरच तो दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचेल, अशीही तिची भावना आहे.हे वैभव पाहिल्यानंतर एक उत्साह मनात संचारला होता व अभ्यासाचा तणाव दूर झाला होता. केवळ बौद्धांसाठीच नाही तर सर्वांसाठीच बुद्धाचे तत्त्व चेतना व प्रेरणा देणारे, एकाग्रता वाढविणारे व शांती प्रदान करणारे असल्याची भावना संचिताने व्यक्त केली.
अकरावीच्या संचिताने शब्दबद्ध केले बौद्ध स्थळांचे वैभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 5:26 AM