लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या सुट्यांमध्ये मातीत मनसोक्त खेळणारे चिमुकले, बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन बाजूला सारून पुढे आलेले दहावी बारावीचे विद्यार्थी आणि स्थापत्यशास्त्रात अभियांत्रिकेचे प्रशिक्षण घेणारे तरुण दिवाळीच्या सुट्यांमध्ये किल्ले बनविण्याच्या कामात चांगलेच रमले आहे. यांच्या कल्पनाशक्ती, कलात्मकता आणि सुप्त गुणातून किल्ल्यांच्या नेत्रदीपक कलाकृती साकार झाल्या आहेत. शिवकिल्ल्यांचा वारसा नागपूर किंवा विदर्भाला नसला तरी, नागपुरात ज्या शिवकिल्ल्यांची निर्मिती झाली आहे ती अनोखी आहे. नागपुरात गेल्या कित्येक वर्षांपासून किल्ले निर्मितीची चळवळ रुजते आहे. या माध्यमातून नागपूरकर तरुण शिवकिल्ल्यांचे वैभव जपत आहे.या चळवळीच्या निर्मितीला स्पर्धेची जोड मिळाली आहे. ही स्पर्धा अख्ख्या नागपूरनगरीत किल्ले निर्मितीचे वेगळेपण जपणारी ठरते आहे. किल्ले हे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहेत. मात्र टीव्ही, संगणक व आता मोबाईलमध्ये रमणाऱ्या पिढीकडून हा ऐतिहासिक वारसा हिरावत चालला असे जाणवते आहे. पण नागपुरात दरवर्षी दिवाळीच्या सुटींमध्ये शिवकिल्ले निर्मितीची चळवळ जोमाने रुजतेय, ही अभिमानाची बाब आहे. बनविण्याची हौस असलेले विद्यार्थी किंवा इतर सहभागी उन्हाळ्याच्या सुट्या किंवा त्यांच्या सोईनुसार अशा गड किल्ल्यांना भेटी देतात. किल्ल्यांची उंची, तासिव कडे, विविध द्वार, तटबंदी, बुरूज, मार्ग, नगरखाने, बाजारपेठा, उपयोग किल्ल्यांच्या निर्मितीत होतो. काहीशी कल्पनाशक्ती, किल्ल्यांचे केलेले अवलोकन यातून आकर्षक किल्यांची निर्मिती झाली आहे. तरुणाईने बनविलेले दर्जेदार किल्ले नागपुरातील विविध भागात बघायला मिळत आहे.
- त्रिमेरुदूर्ग :मार्डन प्रायमरी स्कूल, सिव्हिल लाईन येथे पवन मानवटकर व निशांत महात्मे व रोशनी सरोदे यांनी त्रिमेरुदूर्ग नावाचा काल्पनिक किल्ला तयार केला आहे.
- प्रतापगड :सच्चिदानंदनगर येथेल मंदार व अर्णव उट्टलवार यांनी भव्य प्रतापगडाची निर्मिती केली आहे.
- विजयदूर्ग :खानखोजेनगरात मंगेश बारसागडे याने विजयदूर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार केली आहे.
- प्रतापगड :बेलतरोडी पोलीस स्टेशनजवळ रजत व विवेक चतारे यांनी प्रतापगड किल्ल्याची निर्मिती केली आहे.
- रायगड : अजिंक्य जोशी व पुष्कर दहासहस्त्र यांनी महाल परिसरातील पुस्तक बाजार परिसरातील गोविंद निवासमध्ये ही प्रतिकृती साकारली आहे.
- सिंहगड : शिवगौरव प्रतिष्ठान तर्फे लाडसावंगीकर वाडा, मास्कॉट होंडा, दसरा रोड, महाल येथे ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
- शिवसंस्कृती काल्पनिक किल्ला :कलाकार प्रज्ज्वल प्रतापराव पंदिलवार आणि अभिषेक विजय गोविंदवार.
स्थळ : वसंतराव गोविंदवार निवास, नाईक रोड, महाल, नागपूर.