नागपूर : केंद्र सरकारच्या १८ ते ४४ वयोगटांसाठी मोफत लसीकरणाच्या निर्णयाला एक महिन्याचा कालावधी होऊनही लसीचा तुटवड्याची समस्या कायम आहे. शासकीय केंद्रावर कोणाला पहिला तर कुणाला दुसरा डोस मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे नागपूरकरांवर ‘लस देता का लस’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचा गंभीर प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पुढे असतानाही सरकार मात्र याला गंभीरतेने घेत नसल्याने आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण होत आहे. उलट खासगी केंद्रावर लसीकरण धडाक्यात सुरू आहे. यामुळे खासगी रुग्णालयांत सुकाळ, सरकारीमध्ये दुष्काळ असे विचित्र चित्र निर्माण झाल्याने सामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहरात आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ६५४ लोकांनी पहिला डोस घेतला असून, यातील १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांची संख्या २ लाख ९८ हजार १५३ आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० टक्के ही नाही. २३ जुलैपर्यंत ३ लाख ३९ हजार २१९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून, यात १८ ते ४४ वयोगटांत १५ हजार ८८३ नागरिक आहेत.
-आतापर्यंत झालेले दुसऱ्या डोसचे लसीकरण
:: १८ ते ४४ वयोगट : १५,८८३
:: ४५ ते ५९ वयोगट: १,२१,७५३
:: ६० पेक्षा जास्त वयोगट : १,१८,९१८
-१५ दिवसांत केवळ सहा हजार लोकांना दुसरा डोस
शहरात १८ ते २३ जुलै या दरम्यान १८ ते ४४ या वयोगटांतील १ लाख ३ हजार ८०२ नागरिकांनी पहिला डोस घेतला, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६ हजार ४६८ आहे. सर्व वयोगटांत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ३१ हजार ६०९ असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या ७७ हजार २३६ आहे. या कालावधीत एकूण २ लाख ८ हजार ८४५ नागरिकांनी डोस घेतले आहेत. त्या तुलनेत खासगीमध्ये यातील सुमारे २५ हजार लोकांनी डोस घेतले आहे.
:: हेच का मोफत लसीकरण
-१८ वर्षांवरील नागरिकांसाठी २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच आहे. लसीचा साठा नसल्याचे कारण सांगून १८ वर्षांवरील तरुणांना डावलले जात आहे. व्यापक लसीकरणाचा केवळ गाजावाजाच झाला आहे.
-स्नेहल मून
१८ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा करून प्रत्यक्षात फसवणूक सुरू आहे. शासकीय केंद्रावर लसीचा साठा नाही, उलट खासगी केंद्रावर मोठ्या प्रमाणात साठा आहे. हा भोंगळ कारभार त्वरित थांबायला हवा.
-अनुराग जोशी
-साठा उपलब्ध झाल्यावरच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण
लसीचा साठा उपलब्ध झाल्यावरच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाते, हे खर आहे. इतर दिवशी कमी साठा असल्याने केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून ४५ वर्षांवरील लोकांना पहिला व दुसरा डोस दिला जातो. सध्या ४५ वर्षांवरील लोकांचे बऱ्यापैकी लसीकरण झाल्याने लवकरच १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पूर्णक्षमतेने लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येईल.
-डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी, मनपा