लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यातील ग्रामपंचायत आमगावअंतर्गत असलेली आमगाव व बाबुळवाडा ही दाेन्ही गावे सध्या दहेगाव (जाेशी) प्राथमिक आराेग्य केंद्राला संलग्न आहेत. दहेगाव (जाेशी) आमगावपासून दूर आहे. परंतु नवेगाव खैरी प्राथमिक आराेग्य केंद्र मात्र आमगावपासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांना जाण्या-येण्याचा त्रास पाहता आमगाव व बाबुळवाडा ही दाेन्ही गावे नवेगाव खैरी प्राथमिक आराेग्य केंद्राशी जाेडण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पूर्वीपासून आमगाव व बाबुळवाडा ही दाेन्ही गावे आराेग्यविषयक सुविधेसाठी दहेगाव (जाेशी) प्राथमिक आराेग्य केंद्राला जाेडण्यात आली आहे. परंतु आमगावपासून दहेगावचे अंतर सुमारे २० किमी आहे. त्यामुळे आराेग्य सेवेचा लाभ घेताना हे अंतर अधिक हाेते. शिवाय, गरोदर स्त्रिया, आजारी वृद्ध व्यक्ती, लहान मुले यांना दहेगावला जाणे दूर व खर्चाचे ठरते. याउलट आमगावपासून नवेगाव खैरी हे अंतर अवघ्या ४ किमी इतके आहे. यामुळे आराेग्यविषयक बाबीसाठी नवेगाव खैरी हे साेयीचे हाेते. गेल्या काही वर्षांपासून आमगाव ग्रामपंचायतीला नवेगाव खैरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडण्याची मागणी केली गेली. परंतु त्यावर अद्यापही अंमलबजावणी झाली नाही.
यासंदर्भात आमगाव (बाबुळवाडा) ग्रामपंचायतीने मासिक सभेत दाेन्ही गावे नवेगाव खैरी आराेग्य केंद्राला जाेडण्याबाबतचा ठराव पारित केला. त्यामुळे नागरिकांची आराेग्य सेवेसाठी हाेणारी गैरसाेय लक्षात घेता, आमगाव व बाबुळवाडा या दाेन्ही गावांना नवेगाव खैरी आराेग्य केंद्रांतर्गत जाेडण्याची मागणी सरपंच माया इंद्रपाल गाेरले, भगवान ढाेंगे, अरुण डायरे, रमेश शिवणकर, प्रकाश बावणे, रवी भागडकर, इंद्रपाल गोरले, रंजना रेवतकर, आनंद सायरे, रघुनाथ चोले, प्रकाश लुटे, आनंदराव नखाते, दिगांबर ढोरे, गुणवंता शिवणकर आदींसह नागरिकांनी केली आहे.