अजनी-मडगाव रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत प्रवाशांमध्ये नाराजी : दोन सुट्या वाया गेल्यानंतर सोमवारी सुटते गाडी दयानंद पाईकराव नागपूर प्रायोगिक तत्त्वावर २६ जानेवारी आणि २५ फेब्रुवारीला मडगावसाठी सोडलेल्या विशेष रेल्वेगाड्यांना प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने ३ एप्रिल ते ५ जून दरम्यान प्रत्येक सोमवारी अजनी-मडगाव स्पेशल रेल्वेगाडीची घोषणा केली. बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारी सुटी असते. परंतु ही गाडी सोमवारी सोडण्यात येत असल्यामुळे त्यांच्या दोन दिवसाच्या सुट्या वाया जात असून ही गाडी नागपूरकरांसाठी सुरू करण्यात आली की मुंबईकरांसाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वी २६ जानेवारीला नागपूरवरून मडगावसाठी विशेष रेल्वेगाडी सोडली होती. या गाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर २५ फेब्रुवारीला पुन्हा नागपूर-मडगाव ही रेल्वेगाडी सोडली होती. या गाडीलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या दोन्ही गाड्या सकाळी ८ वाजता नागपूरवरून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळीच मडगावला पोहोचत होत्या. यामुळे सकाळी उतरून हॉटेल बुक केले की दिवसभर गोवा भ्रमंती करण्यासाठी विदर्भातील पर्यटकांना वेळ मिळत होता. परंतु ३ एप्रिल ते ५ जून दरम्यानच्या अजनी-मडगाव या गाडीचा दिवस आणि वेळ नागपूरकरांच्या नव्हे तर मुंबईकरांच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याची ओरड होत आहे. ही गाडी सोमवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटून मडगावला मंगळवारी रात्री ९.३० वाजता पोहोचते. रेल्वे प्रशासनातर्फे १ जुलैपासून नवे वेळापत्रक जारी करण्यात येते. या वेळापत्रक अजनी-मडगाव ही गाडी नियमित करून दिवसात बदल करावा. नागपूरकरांना लवकर गोव्याला पोहोचता यावे यासाठी ही गाडी योग्य मार्गावर चालविण्यासाठी प्रयत्न करावा. नागपूरकरांच्या दोन दिवसांच्या सुट्या वाया जाऊ नयेत यासाठी भारतीय यात्री केंद्राने रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले आहे.’ - बसंत कुमार शुक्ला, सचिव भारतीय यात्री केंद्र स्पेशल रेल्वेगाड्यांचा दिवस आणि वेळ मुंबई मुख्यालयातून निश्चित करण्यात येतो. एखादी गाडी नागपूर आणि मुंबई दोघांच्याही दृष्टीने सोईस्कर ठरू शकत नाही. त्यासाठी उपलब्ध असलेले रॅक, मार्ग आणि इतर बाबी तपासून संबंधीत गाडीची वेळ निश्चित करण्यात येते.’ -कुश किशोर मिश्र, ‘सिनिअर डीसीएम’, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
गोवा स्पेशल नागपूर की मुंबईकरांसाठी ?
By admin | Published: April 17, 2017 2:06 AM