लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २५ वर्षाच्या वयात आठ राष्ट्रीय, सहा आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह एकूण २,५३९ पुरस्कार प्राप्त करणारी अष्टपैलू प्रतिभेची धनी डॉ. शिराली रुणवाल गजराजा मेडिकल कॉलेज, ग्वाल्हेरमध्ये स्त्रीरोग विशेषज्ञ म्हणून स्नातकोत्तर(एमए)मध्ये शिकत आहे. चिकित्सक असतानाही चित्रकला, कविता, क्वीझ स्पर्धेत त्यांना विशेष आवड आहे. नीट पीजी २०१८ मध्ये देशात दुसरी रँक प्राप्त केल्यानंतरही त्यांनी ग्वाल्हेर सोडले नाही. चिकित्सा क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या आता स्त्रीरोग विशेषज्ञ या नात्याने देशात रोबोटिक गायनाकोलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहेत. गावापर्यंत रोबोटिक गायनाकोलॉजीचे लाभ पोहोचविण्याचे लक्ष्य निर्धारित करीत त्या पुढे चालत आहेत. खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरला आल्या असता त्यांनी लोकमतसोबत संवाद साधत वर्तमान व भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला.
प्र. - चिकित्सक म्हणून तुम्ही समाजासाठी काय करू इच्छिता?
उत्तर - स्त्रीरोग विशेषज्ञ या नात्याने देशात रोबोटिक गायनाकोलॉजीला प्रोत्साहन मिळावे, अशी इच्छा आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे देशातील कानाकोपऱ्यातील स्त्रियांची सर्जरी करता येऊ शकते. अनेक गावे अतिशय दुर्गम भागात येतात. तेथील महिलांची प्रसूती यशस्वीरीत्या करणे, हेच ध्येय आहे. फेलोशिप मिळाल्यानंतर परदेशात जाईल आणि परतून देशातच काम करीन.
प्र. - वैद्यकीय क्षेत्राशिवाय अन्य कोणत्या क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे?
उत्तर - एमएसच्या शिक्षणानंतर आयएएस बनण्यासाठी परीक्षा देणार आहे. दहावी, बारावी, पीएमटी, नीटमध्ये टॉप केले आहे. त्यामुळे एकवेळ यूपीएससीची परीक्षा देईल. समाजसेवा हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे स्लम भागात सातत्याने उपक्रम राबवून लोकांची मदत करीत असते.
प्र. - तुमच्या यशाचा गुरुमंत्र काय?
उत्तर - पुरस्कारांसाठी मी कुठलेच काम करीत नाही. मात्र, कामासाठी केलेले परिश्रम पुरस्कारांच्या रूपाने बाहेर पडते. मला बरेच पुरस्कार मिळाले, परंतु त्याचे प्रदर्शन कधीच केले नाही. यशाने हुरळून जाऊ नका आणि मती शाबूत ठेवा, हाच माझा गुरुमंत्र आहे. त्याचमुळे अवॉर्ड, मेडल, पुरस्कार एका डब्यात बंद करून ते बिछान्याखाली ठेवून देते. २०१८ मध्ये एमबीबीएस पूर्ण केले. याचदरम्यान ३७ गोल्ड मेडल जिंकले. एमएसचे शिक्षण मे महिन्यात पूर्ण होईल.
प्र. - नीटमध्ये दुसरी रँक मिळाल्यानंतर काय वाटले?
उत्तर - ग्वाल्हेर सोडण्याची इच्छा मुळीच नव्हती. त्यामुळेच नीटमध्ये दुसरी रँक मिळाल्यानंतरही गजराराजा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथे माझे आजोबा प्रेमचंद रुणवाल वरिष्ठ चिकित्सक होते. वडील बालरोग विशेषज्ञ डॉ. अरविंद रुणवाल, आई स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. सुधासुद्धा चिकित्सा क्षेत्राशी जुळलेली आहे. म्हणूनच देशात शिक्षण पूर्ण झाल्यावर विदेशात सेटल होण्याची कोणतीच इच्छा नाही. समाजाकडून जे मिळाले ते इथेच राहून परत करायचे आहे.
प्र. - चित्रकला, कविता, प्रश्नमंजूषाबाबतची आवड असण्याचे कारण सांगा.
उत्तर - अडीच वर्षाची असताना चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले. तेथे पहिला पुरस्कार जिंकला. विशेष म्हणजे जिथे हा पुरस्कार मिळवला, तेथे आई-वडिलांसह फिरायला गेले होते. त्यानंतर पाच वर्षाची असताना चित्रकला स्पर्धेसाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. के.आर. नारायणन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारले. कविता करण्यासाठी शंकर इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त झाले. ‘तारे जमीं पर’ चित्रपटात ‘कुए का मेंढक’ ही कविता माझीच होती. एनसीईआरटी, सीबीएसई, आयसीएसईमध्ये माझ्या तीन कविता मुलांना शिकविल्या जात आहेत. पंचतंत्रमधील कथांना संस्कृत कवितांमध्ये परिवर्तित केले. चरखी डोर पतंग, क्लाईडोस्कोपसारख्या कविता खुप प्रसिद्ध झाल्या.
प्र. - आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या पेंटिंगला ओळख मिळाली आहे.
उत्तर - मेक्सिको सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन झाले होते. यात १७६ देशातून स्पर्धक सहभागी झाले. भारतातून माझी पेंटिंग निवडल्या गेली. ‘फिशिंग दि होराईझन’ शीर्षक असलेल्या या पेंटिंगचे बरेच कौतुक झाले. इजिप्त, चीन, रशियामध्येही पेंटिंगचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
काही महत्त्वाच्या उपलब्धी
* डॉ. शिरालीला पहिला अवॉर्ड अडीच वर्षाची असताना चित्रकलेत प्राप्त झाला.
* चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी २००२ मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया अवॉर्ड मिळाला.
* वीरांगना लक्ष्मीबाई अवॉर्ड २०११ मध्ये मिळाला.
* राज्यपाल सन्मान २०१२ मध्ये मिळाला.
* बालकांचा पद्मश्री म्हणवला जाणारा बालश्री अवॉर्ड २०११ मध्ये मिळाला.
* लागोपाठ तीन वर्षापर्यंत प्रभात रतन अलंकरणने सन्मानित.
* याशिवाय अनेक अवॉर्ड प्राप्त.
...............