नागपूर : देशभरातील मकरसंक्रांतीचा उत्साह पक्ष्यांच्या जिवावर बेतला. गुजरातसह राजस्थानच्या जयपूरमध्येही पतंगबाजीचा उत्साह शिगेला पाेहोचलेला असताे. यावर्षीही ताे हाेता व यावेळीही शेकडाे गगनविहारी पतंगांच्या मांजाचे बळी ठरले. मात्र शेकडाेंच्या संख्येने जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचारही झाला. मांजाने जायबंदी झालेल्या या पक्ष्यांसाठी सहा डाॅक्टरांची टीम देवासारखी ठरली आणि यात नागपूरच्याही तीन डाॅक्टरांचा समावेश हाेता, हे महत्त्वाचे.
डाॅ. उष्मा पटेल, डाॅ. चेतन पाताेंड व डाॅ. ऐश्वर्या बेतगिरी अशी या पशुवैद्यक तज्ज्ञांची नावे आहेत. वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि रक्षा फाऊंडेशन यांच्यावतीने दरवर्षी मकरसंक्रांतीच्या काळात जखमी पक्ष्यांसाठी उपचार केंद्र लावण्यात येते. डाॅ. उष्मा पटेल यांना दरवर्षी सेवा देण्यास बाेलावण्यात येते. यावर्षीचा अनुभव मात्र वेगळा ठरल्याचे त्या म्हणाल्या. काेराेनामुळे संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागली. पक्ष्यांच्या उपचारासाठी सतत पीपीई कीट घालून राहावे लागत असल्याने काम त्रासदायक हाेते. मात्र या परिस्थितीत डाॅक्टरांच्या पथकाने ३०० च्या वर जखमी पक्ष्यांवर उपचार केले. यातील निम्म्यापेक्षा जास्त पक्ष्यांना शस्त्रक्रिया करून वाचविण्यात आल्याचे डाॅ. उष्मा यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
ॲनेस्थेशियानंतर ऑक्सिजन द्यावा लागला
मानवाप्रमाणे पक्ष्यांवरही शस्त्रक्रिया करताना भूल देणे गरजेचे असते. काही पक्ष्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला. विशेषत: गळ्याला दुखापत झालेल्या पक्ष्यांसाठी त्याची व्यवस्था करण्यात आली. अधिक गंभीर पक्ष्यांसाठी ऑक्सिजन लेव्हलचा समताेल राखणेही महत्त्वाचे असल्याचे डाॅ. उष्मा यांनी सांगितले. गळ्याला जखम झालेला माेर, गरुड, विविध प्रजातींची घुबडे, कार्माेरांट, लॅपविंग, पानकाेंबळी, किंगफिशर, काॅमन बझार्ड, कुकल, कबुतर अशा १५० वर पक्ष्यांच्या शस्त्रक्रिया केल्या.
काेराेना, एन्फ्लुएंजाचे आव्हान
दुसरीकडे बर्ड फ्लू व एन्फ्लुएंजाचेही आव्हान डाॅक्टरांसमाेर हाेते. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांशिवाय प्रवासी पक्षी व अभयारण्यातील पक्ष्यांवर विशेष भर देण्यात आला. एन्फ्लुएंजाचा प्रादुर्भाव हाेऊ लागल्याने जयपूरचे प्राणीसंग्रहालयही बंद ठेवण्यात आले हाेते. त्यामुळेही आव्हान माेठे हाेते. त्यामुळे सतत पीपीई कीट घालून विशेष काळजी घ्यावी लागल्याचे डाॅ. उष्मा म्हणाल्या.
उष्मा यांच्या ३५०० वर शस्त्रक्रिया
डाॅ. उष्मा पटेल यांना दरवर्षी गुजरात किंवा जयपूरला पाचारण करण्यात येते. गेल्या काही वर्षांत डाॅ. उष्मा यांनी ३५०० वर जखमी पक्ष्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले आहे. नागपुरातही जखमी पक्ष्यांसाठी त्यांची सेवा सुरू असते.