सुमेध वाघमारे नागपूर : पारडी येथील शिवमंदिरात ५ वर्षीय मुलगी खेळत असताना पाय घसरून त्रिशूलवर पडली. त्रिशूळ मानेतून शिरून तोंडातून बाहेर आला. तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी त्रिशूळ तोडून तातडीने न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे उपचार करीत मुलीचे प्राण वाचविले.
भांडेवाडी एकतानगर येथील ही ५ वर्षीय मुलगी शनिवारी पारडी येथील नातेवाईकांकडे आली होती. घराजवळ असलेल्या शिवमंदिरात आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती त्रिशूळावर पडली. त्रिशूळचा एक शूळ तिच्या मानेतून शिरून जबडा फाडून तोंडातून बाहेर आला. हे पाहून तिच्या मैत्रिणी घाबरल्या, त्यांनी आरडाओरड केला. काहींनी तिच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. तोपर्यंत परिसरातील लोकही जमा झाले. त्यांनी लागलीच शिरलेली शूळा कापली व तातडीने तिला न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी कर्तव्यावर असलेले न्यूरोसर्जन डॉ. नीलेश अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन शस्त्रक्रिया गृहात घेतले. शल्यचिकित्सक डॉ. सुनील पांडे, भूलतज्ज्ञ डॉ. साहिल बन्सल, ईएनटी सर्जन डॉ. समीर ठाकरे, प्लास्टिक सर्जन डॉ. गौरव जुन्नवार व क्रिटीकल केअर तज्ज्ञ डॉ. नितीन देवते यांनी मिळून शस्त्रक्रियेला सुरुवात केली. अथक परिश्रमाने गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
-अनुभव व कौशल्याचा बळावर मिळाले यश‘लोकमत’शी बोलताना डॉ. अग्रवाल म्हणाले, त्रिशूळ मुलीच्या मानेतून शिरुन तोंडातून निघाला होता. त्यामुळे ‘ट्रेकीओस्टॉमी’ न करता ‘इंट्यूबेशन’ करणे कठीण होते. परंतु डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्याने बारीकबारीक नियोजन करीत जीवाची सुरक्षितता निश्चित करीत शस्त्रक्रिया केली. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. तिच्यावर डॉक्टरांचे एक पथक लक्ष ठेवून आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. निधीश मिश्रा व डॉ. आनंद संचेती यांनीही शस्त्रक्रियेत मार्गदर्शन केले.