- अवैध पार्किंगचा विळखा : बडकस चौक, शुक्रवारी, गांधीद्वारमधून वाहन काढणे कठीण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरची खरी ओळख म्हणजे महाल होय. जुने नागपूर म्हणूनच या परिसराची ओळख आहे. वाठोडा, खरबी, पारडी आदी जुन्या वस्तीतील जुने लोक आजही महालात जातात, तेव्हा नागपुरातून येतो असे सांगतात. गोंड, भोसले राजपाठाचा इतिहास संचयन करवून ठेवणाऱ्या या परिसराला या दोन्ही राजकुळाच्या राजवाड्यांमुळेच (महालांमुळेच) हा परिसर महाल म्हणून सर्वत्र विख्यात आहे. येथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. वेदाध्ययानाची परंपरा जपणारी भाेसले वेदशाळाही नजीकच आहे. जवळच शहीद शंकर महाले यांचे स्मारकही आहे. सोबतीला कायम गजबजलेली बाजारपेठही आहे. झेंडा चौक, कल्याणेश्वर मंदिर, बडकस चौक, गांधीद्वार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक पुतळा, मातृसेवा संघाची भव्य अशी इमारत, जुनी शुक्रवारी, गाडीखाना, आयचित मंदिर, लाकडीपूल असा भव्यदिव्य परिसर महाल म्हणूनच ओळखला जातो. येथे लोकवस्ती मोठी आहे. त्यामुळे इतरत्र परिसरातून महालात खरेदीसाठी जाताना किंवा नातेवाईकांकडे जाताना प्रमुख प्रश्न पडतो तो असा की, वाहन पार्क करण्याची जागा असेल का? खरेदी-विक्रीसाठी असणारी रात्रंदिवस गर्दी, मोठमोठी दुकाने आदींमुळे येथे वाहन पार्क करणे म्हणजे दिव्यच. काहीच वर्षांपूर्वी बडकस चौकात एक पार्किंग प्लाझा उभारला गेला आहे. शिवाय, रामभंडारपुढे भोसले राजवटीच्या जागेवरच पार्किंगची सोय करण्यात आली आहे; मात्र तरी देखील या परिसरातील पार्किंगची समस्या सुटलेली नाही.
बडकस चौक ते चिटणवीस पार्क स्टेडियम
बडकस चौक ते चिटणवीस पार्क स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावर चारचाकींची अवैध पार्किंग अतिशय विस्कळीतपणे केली जाते. आधीच निमुळता असलेल्या या मार्गावरून स्टार बस, ऑटो यांचे वहन होत असते. त्यात या अवैध पार्किंगमुळे रस्ता तुंबल्यासारखी स्थिती निर्माण होते.
गांधीद्वार ते काशीबाई घाट
चिटणवीस पार्क स्टेडियम, गांधीद्वार ते काशीबाई घाट या रस्त्यावर प्लेक्स, ज्वेलर्स, किराणाची दुकाने आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा अवैधरित्या वाहने पार्क केली जातात. त्यामुळे, बरेचदा लहान-मोठे अपघात घडत असतात.
गांधीद्वार ते कल्याणेश्वर मंदिर
गांधीद्वार ते कल्याणेश्वर मंदिराचा हा रस्ता अतिशय निमुळता आहे. येथे सर्वच प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये गर्दीही प्रचंड असते. दुकानांमध्ये येणारे ग्राहक दुकानापुढेच रस्त्यावर वाहने पार्क करतात. त्यामुळे येथे कायम चक्का जाम होतो. त्यात स्टार बस, मोठे वाहन, पिकअप व्हॅन शिरली तर मागे-पुढे जाणे कठीण होते.
वस्त्यांमध्ये नागरिकांना त्रास
बाजारात जायचे म्हणून अनेक वाहक आपली वाहने कोठी रोडसारख्या अंतर्गत गल्ल्यांमध्ये पार्क करून निघून जातात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपली वाहने काढण्यास अडचण निर्माण होते.
...............