नागपूर : शहरात ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे; परंतु कोरोनाच्या प्रतिबंधित नियमांकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषत: मेडिकलसारख्या मोठ्या रुग्णालयांमधील ‘ओपीडी’च्या ठिकाणी गर्दी होत असल्याने व योग्य पद्धतीने मास्कचा वापर होत नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी जाताय की, ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपुरात ‘ओमायक्रॉन’बाधित पहिल्या रुग्णाची नोंद १२ नोव्हेंबर रोजी झाली. त्यानंतर ११ व्या दिवशी या विषाणूचा दुसरा रुग्ण आढळून आला असताना चौथ्या दिवशीच तिसरा रुग्ण, तर त्यानंतर तिसऱ्या दिवशी तीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ‘ओमायक्रॉन’बाधित रुग्णांची संख्या ६ झाली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. मागील चार महिन्यांपासून दोन किंवा तीन आठवड्यांतील रुग्णसंख्या शंभरी गाठत होती. आता मागील पाचच दिवसांत बाधितांची संख्या १९१ वर पोहोचली आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
ना सोशल डिस्टन्सिंग...
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व वारंवार हात धुणे हाच पर्याय आहे; परंतु मेडिकलमध्ये कोरोनाचे रुग्ण भरती होत असताना याच रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंगचा नियम धुडकावून लावला जात असल्याचे चित्र आहे. नोंदणी करणाऱ्या खिडकीपासून ते डॉक्टरांच्या कक्षासमोर लागणाऱ्या रुग्णांच्या रांगेत कुठेत सोशल डिस्टन्सिंग आढळून येत नाही.
८० टक्क्यांहून अधिकांचा भर कापडी मास्क, रुमाल किंवा दुपट्ट्यावर
बाधित रुग्ण शिंकल्यास त्याच्या संसर्गापासून संरक्षण व्हावे किंवा आपण शिंकल्यास तोंडातील तुषार इतरत्र उडू नयेत यासाठी ‘एन ९५ मास्क’चा वापर महत्त्वाचा ठरतो; परंतु मेडिकलच्या ओपीडीमध्ये २० ते ३० टक्केच रुग्ण या मास्कचा वापर करताना दिसून येतात, तर ७० ते ८ ० टक्क्यांहून अधिक रुग्ण व त्यांचे नातेवाईक कापडी मास्क, रुमाल किंवा दुपट्ट्याचा वापर करीत असल्याचे तर जवळपास ५ ते १० टक्के रुग्ण व त्यांचे नातेवाईक मास्कचा वापरच करीत नसल्याचे चित्र आहे.