मोरेश्वर मानापुरे, नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना मागणी वाढल्याने देशांतर्गत नागपुरातील स्थानिक सराफा बाजारात बुधवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ८०० रुपये आणि किलो चांदी १,७०० रुपयांनी वाढले. बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात सहादा तर मंगळवारी तीनदा चढउतार झाली.
माहितीनुसार, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळच्या सत्रात १०.३० च्या सुमारास सोन्याचे भाव १०० रुपयांनी वधारून ७२,२०० रुपयांवर स्थिरावले. मात्र, चांदी २०० रुपयांनी उतरून ८९,३०० रुपयांपर्यंत भाव कमी झाले. दुपारी १२.२० वाजता सोने १०० रुपये आणि चांदीत ४०० रुपयांची वाढ, दुपारी १ वाजता सोने पुन्हा १०० रुपयांनी आणि चांदीत ३०० रुपयांची वाढ झाली. दुपारी दीडच्या सुमारास सोने १०० रुपयांनी पुन्हा वाढले आणि चांदीत ५०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात सोने २०० रुपये आणि चांदी ३०० रुपयांनी वधारली. अखेर रात्री ८.१० च्या सुमारास सोन्याचे भाव पुन्हा २०० रुपयांनी वाढून ७२,९०० रुपये आणि किलो चांदी ४०० रुपयांनी वाढून भावपातळी ९१,२०० रुपयांवर स्थिरावली.
सराफा व्यापारी शोरूममध्ये साधारण भाव प्रकाशित करतात. मात्र, विक्री करताना ग्राहकांकडून साधारण भावावर तीन टक्के अतिरिक्त जीएसटी आकारतात. त्यामुळे बुधवारी रात्री सराफा बाजारात दहा ग्रॅम (२४ कॅरेट) शुद्ध सोन्याचे भाव ७५,०८७ रुपये आणि किलो चांदी ९३,९३६ रुपयांत विकल्या गेली.