मोरेश्वर मानापुरे, नागपूर: मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेले सोने आणि चांदीच्या किंमती आता खाली घसरत आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंनी आतापर्यंतचे भाववाढीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले असून सोने-चांदीची घौडदौड सुरु असताना गेल्या आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला आणि सोने एक हजार आणि किलो चांदीच्या दरात ८०० रुपयांची घसरण होऊन भावपातळी अनुक्रमे जीएसटीविना ७१,६०० आणि ८०,६०० रुपयांवर स्थिरावली.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे अनेकजण या दिवशी सोने-चांदी खरेदीच्या विचारात असतील. त्या सर्वांसाठी खूशखबर आहे. सोने आणि चांदीच्या जागतिक किंमतीतही कमजोरी दिसून येत आहे. येत्या काळात दर आणखी कमी होण्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याचे भाव कमी होत असून चांदीची किंमतही घसरण होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवार, २९ एप्रिलला सोन्याचे दर ७२,६०० रुपये होते. मंगळवारी ३०० रुपयांची घसरण झाली. बुधवारी पुन्हा ७०० रुपयांनी भाव कमी होऊन ७१,६०० रुपयांवर स्थिरावले. गुरुवारी ३०० रुपयांची वाढ तर शुक्रवारी ३०० रुपयांची घसरण झाली. शनिवार, ४ मे रोजी भाव ७१,६०० रुपयांवर स्थिरावले. याचप्रमाणे सोमवार, २९ एप्रिलला चांदीचे दर ८१,४०० रुपये होते. आठवड्यात चढउतार होऊन शनिवार, ४ मे रोजी भाव ८०,६०० रुपयांपर्यंत खाली आले.