लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोनसाखळी लुटारूंनी मंगळवारी भरदुपारी चार तास हैदोस घालून तीन ज्येष्ठ नागरिकांना लुटले. या घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.पहिली घटना नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत दुपारी ३.३० वाजता घडली. सहकारनगर खरबी येथील ६० वर्षीय रत्नकला सूर्यवंशी या दुपारी ३.१५ वाजता घरी एकट्या होत्या. त्याचवेळी एक युवक आला. त्याने रत्नकला यांना खोली भाड्याने मिळेल का? अशी विचारणा केली. त्यांनी नकार दिल्यावर त्या युवकाने पिण्यासाठी पाणी मागितले. रत्नकला पाणी घेऊन आल्या. पाणी देऊन झाल्यावर त्या मागे वळताच युवकाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. रत्नकला यांना काही समजण्यापूर्वीच तो फरार झाला.दुसरी घटना सायंकाळी ६.३० वाजता प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत स्वावलंबीनगर येथे घडली. ७३ वर्षीय राजश्रीताई मधुकर मुंदाफळे परिसरात गेल्या होत्या. तेथून त्या पायी घरी परत येत होत्या. घराजवळच एका बाईकवर आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. त्याचप्रकारे शिवशक्तीनगर येथील ६६ वर्षीय नोरमा गिरधारी गजभिये या रात्री ७.३० वाजता सोनेगाव तलाव परिसरातून पायी जात होत्या. अज्ञात युवकांनी त्यांच्या गळ्यातील २२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.