काटाेल (नागपूर) : दाेन अनाेळखी व्यक्तींनी दुचाकीचालकास अडवून आपण पाेलीस असल्याची बतावणी केली आणि गळ्यातील साेन्याची चेन वाहनाच्या डिक्कीत ठेवण्याची सूचना केली. त्यातच त्या दाेघांनी ती साेन्याची चेन चाेरून नेली. त्या चेनची किंमत २९ हजार रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले. ही घटना काटाेल शहरात गुरुवारी (दि. ३१) दुपारी घडली.
तेजराम सूरज मोरोलिया (५२, रा. मायवाडी, ता. नरखेड) हे कामानिमित्त माेटरसायकलने काटाेल शहरात आले हाेते. दाेन अनाेळखी व्यक्तींनी त्यांना काटाेल-जलालखेडा राेडवरील मंगल कार्यालयाजवळ अडविले व गळ्यातील साेन्याची चेन काढून ती डिक्कीत ठेवण्याची सूचना केली. त्यांनी सूचनांचे पालन करीत चेन काढून डिक्कीत ठेवली.
संशय आल्याने त्यांनी काही अंतरावर डिक्की तपासून बघितली असता, चेन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या चेनची किंमत २८ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी हेल्मेटचा वापर करून आपण पोलीस असल्याची बतावणी करीत लुटमार करणे सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.