मोरेश्वर मानापुरे
नागपूर : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सोन्याचे भाव कमी होत आहेत. जून महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसत आहे. ८ जून रोजी सोन्याचे दर ६० हजारांखाली अर्थात ५९,९०० रुपयांपर्यंत कमी झाले. त्यामुळे पुढे दरवाढीची शक्यता कमी असून गुंतवणुकीदारांसाठी हीच सुवर्ण संधी असल्याचे सराफांचे मत आहे.
५ मे रोजी सोन्याने ६२,१०० रुपयांचा उच्चांक गाठला होता. लवकरच सोने ७० हजारांचा उच्चांक गाठेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण पुढे दर न वाढता कमी होऊ लागले. सोने ६२ हजारांवर गेल्यानंतर ग्राहकांची खरेदीही कमी झाली आणि ते दर कमी होण्याची वाट पाहू लागले. यापुढे दर कमी होणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी या दरात खरेदी करावी, असे आवाहन सराफांनी गुरुवारी केले आहे.
सोन्यासह चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक महिन्यात सोने (९५.५ टक्के) २,२०० रुपये तर किलो चांदी ५,५०० रुपयांनी उतरली आहे. सोने आणि चांदीच्या दरावर ३ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांना एक तोळा सोने खरेदीसाठी ६१,७०० रुपये चुकते करावे लागेल..