नागपूर: यावर्षीच्या सुरुवातीला २ जानेवारीला नागपुरात ६३,८०० (जीएसटीविना) रुपयांवर गेलेले २४ कॅरेट (९९.९ टक्के शुद्धता) सोन्याचे दर १५ फेब्रुवारीला ६१,८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सोने-चांदीच्या दरात चढउताराचा काळ सुरूच आहे. कधी स्वस्त तर कधी महाग होताना दिसत आहे. चांदीचे दरही २ जानेवारीच्या ७४,६०० रुपयांच्या तुलनेत ७०,६०० रुपयांपर्यंत उतरले आहेत. सध्या सोन्यासह चांदीच्या दरानेही ग्राहकांना दिलासा दिला आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंवर ३ टक्के जीएसटी वेगळा आकारला जातो, हे विशेष.
या आठवड्यातही सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सोमवारच्या ६२,८०० रुपयांच्या तुलनेत एक हजार आणि चांदीच्या दरातही १ हजाराची घसरण झाली. या महिन्याच्या सुरुवातीला १ फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात सोने १०० रुपयांनी महाग होऊन ६३,२०० रुपयांवर पोहोचले. दुपारच्या सत्रात १०० रुपयांनी उतरले. मात्र २ फेब्रुवारीला तब्बल ५०० रुपयांची दरवाढ होऊन भाव ६३,५०० रुपये आणि चांदीचे प्रति किलो दर ७२,५०० रुपयांवर गेले. मात्र, ३ फेब्रुवारीला ३०० आणि चांदीत ९०० रुपयांची घसरण झाली. सोने-चांदीच्या चढउतारानुसार १२ फेब्रुवारीला सोने ६२,८०० आणि चांदीचे दर ७२ हजारांवर पोहोचले. १३ रोजी १०० रुपयांची घसरण होऊन भाव ६२,७०० आणि चांदी ७१,८०० रुपये, १४ रोजी ६१,९०० आणि चांदी ६९,९०० रुपये तसेच १५ फेब्रुवारीला सोन्यात १०० रुपयांची घसरण तर चांदीत ७०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी अनुक्रमे ६१,८०० रुपये आणि ७०,६०० रुपयांवर पोहोचली.
नागपुरात १५ फेब्रुवारीला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ६१,८०० आणि २२ कॅरेटचे दर जीएसटीविना ५८,७०० रुपये हाेते. अर्थात २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात ३१,१०० रूपयांचा फरक आहे. ९० टक्के दागिने २२ कॅरेटने तयार केले जातात. त्यामुळे २२ कॅरेटच्या सोन्याची सर्वाधिक विक्री होते. सध्या दोन्ही मौल्यवार धातूंचे दर वाढणार नाहीत, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.