लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता सराफांच्या शोरूम आणि अन्य माध्यमाद्वारे सोने आणि चांदीचे दर जीएसटीसह प्रकाशित करण्याचा निर्णय इतवारी सोना-चांदी ओळ कमिटीने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आहे. त्यानुसार तीन दिवसांपासून मौल्यवान धातूंचे दर जीएसटीसह प्रकाशित करण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांसोबत दरदिवशी होणाऱ्या झंझटीपासून पुढे सुटका मिळणार असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.दरदिवशी बदलत्या दरानुसार सराफा असोसिएशनतर्फे पूर्वी २२, २३ आणि २४ कॅरेट सोने आणि कच्ची व पक्की चांदीचे दर प्रकाशित करण्यात येत होते. पण ग्राहक सोने आणि चांदीच्या वस्तू खरेदीसाठी सराफांकडे जायचे तेव्हा प्रकाशित दरातच सोने, चांदी मागायचे. पण दुकानदार जीएसटी आकारून बिल द्यायचे तेव्हा ग्राहक वाद घालायचे. त्यावेळी बिल नकोच अशी ग्राहकांची भूमिका असायची. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमाशुल्कात २.५ टक्के वाढ केल्यामुळे आता १२.५ टक्के सीमाशुल्क आकारण्यात येत आहे. याशिवाय खरेदीवर ३ टक्के जीएसटी आकारण्याची तरतूद आहे. एक लाखाचे सोने खरेदी केल्यास ग्राहकाला तीन हजार रुपये जीएसटीसह एक लाख तीन हजार रुपये द्यावे लागतात. जीएसटी देण्यास ग्राहकांचा कायमच नकार असतो. अशावेळी ग्राहकांना समजवून जीएसटीसह बिल घेण्याचा आग्रह करण्यात येतो. आता सर्वच शोरूममध्ये जीएसटीसह शुद्ध सोन्याचे भाव प्रकाशित करण्यात येत असल्यामुळे सराफांचे काम सोपे झाले आहे. १ जुलै २०१७ ला जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर ९० टक्के दुकानदार जीएसटीच्या टप्प्यात आले आहेत. सराफांची सर्वच कामे पक्के बिलाने होत आहेत. अशास्थितीत ग्राहक बिल घेत नसेल तर दुकानदाराला खरेदी-विक्रीचा ताळमेळ साधणे शक्य होणार नाही, असे मत इतवारी सोने-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे यांनी व्यक्त केले.
कॅरेटनुसार सोने खरेदीआता केवळ २४ कॅरेट शुद्ध सोने आणि पक्की चांदीचे भाव प्रकाशित करण्यात येतात. ग्राहकांना २२, २३ वा २४ कॅरेटचे सोने हवे असल्यास दररोजच्या बदलत्या भावावर ३ टक्के जीएसटी आकारून पक्के बिल देण्यात येते. ग्राहकांना त्या दिवशीचे कॅरेटनुसार सोन्याचे भाव आणि जीएसटीची माहिती असल्यामुळे ग्राहक आता वाद घालत नसल्याचा अनुभव दुकानदारांना येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.