नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याला अचानक मागणी वाढल्याने शुक्रवारी ५६,९०० रुपयांवर असलेले दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर शनिवारी सायंकाळच्या सत्रापर्यंत एक हजार रुपयांनी वाढून ५७,९०० रुपयांवर पोहोचले. तर चांदीत २ हजार रुपयांची वाढ होऊन ७० हजारांची पातळी गाठली आणि भाव ७०,१०० रुपयांवर स्थिरावले. दरवाढीमुळे सराफा बाजारात पुन्हा उत्साह संचारला आहे.
सोन्याचे दर कमी होऊ लागल्यानंतर ग्राहकांनी खरेदी थांबविल्याचे चित्र बाजारात ग्राहकांच्या संख्येवरून दिसून येत होते. पितृपक्षात सोने आणखी कमी होण्याचे संकेत दिले जात होते. तर दुसरीकडे नवरात्रीत सोने वाढण्याची अपेक्षा सराफा व्यक्त करीत होते. त्यानुसार शनिवारी सोन्याने १ हजाराने उसळी घेतल्याने सोमवारी ग्राहकांची पावले पुन्हा सराफा बाजाराकडे वळतील, असे मत नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी बंद बाजारात सोन्याचे दर ५६,९०० रुपयांवर स्थिरावले होते. शनिवारी सकाळी खुलत्या बाजारात सोने ४०० रुपयांनी वाढून ५९,३०० रुपयांवर पोहोचले. तर चांदीे एक हजार रुपयांनी वाढून ६९,१०० रुपयांवर गेली. त्यानंतर दुपारच्या सत्रात १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर पुन्हा ५०० रुपयांनी वाढून ५७,९०० रुपयांपर्यंत गेले. वाढले. तर चांदीचे दर ७०,१०० रुपयांवर गेले. सोमवारी खुलत्या बाजारात दोन्ही मौल्यवान धातूच्या दरात चढउतार दिसून येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.