नागपूर : गुरुवारी नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याच्या भावाने पुन्हा ऐतिहासिक उच्चांक गाठला. बुधवारच्या ६७ हजारांच्या तुलनेत गुरुवारी ५०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ६७,५०० रुपयांवर स्थिरावली. ३ टक्के जीएसटीसह भाव ६९,५२५ रुपयांवर पोहोचले आहे. दागिने खरेदी करताना ग्राहकांना १३ ते २० टक्क्यांपर्यंत मेकिंग शुल्क वेगळे द्यावे लागते, हे विशेष.
सात दिवसात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव १५०० रुपयांनी वाढले आहेत. हे भाव गुढीपाडव्यापर्यंत ७० हजारांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. २० मार्चला शुद्ध सोन्याचे भाव ६६ हजार, तर २८ मार्चला भाव ६७,५०० रुपयांवर पोहोचले. २७ मार्चला सोन्याचे भाव ६७ हजार रुपये होते. २८ मार्चला सकाळच्या सत्रात २०० रुपयांनी वाढले, तर सायंकाळी बाजार बंद होताना भावपातळी ३०० रुपयांनी वाढून ६७,५०० रुपयांवर पोहोचली. भाववाढीमुळे ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दागिने तयार करण्यासाठी सर्वाधिक उपयोगात येणारे २२ कॅरेट सोन्याचे भाव जीएसटीविना ६२,८०० रुपयांवर पोहोचले आहेत.