मोरेश्वर मानापुरे, नागपूर : दहा ग्रॅम शुद्ध (२४ कॅरेट) सोन्याने पहिल्यांदाच नागपूर सराफा बाजारपेठेत ७० हजार रुपयांचा आकडा पार करीत भाव ऐतिहासिक ७०,३०० रुपयांवर स्थिरावले. प्रत्यक्ष पाहता ग्राहकांना ३ टक्के जीएसटीसह सोने ७२,४०९ रुपयांना खरेदी करावे लागत आहे.
गुढीपाडव्यापूर्वीच ७० हजारांचा भाव गाठल्याने ग्राहक सोने खरेदी करतील वा नाही, अशी शंका या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र, सोन्याचे भाव आणखी वाढण्याच्या भीतीने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे सराफांनी सांगितले. नागपूर सराफा बाजारात ३ एप्रिलला सोन्याचे भाव ६९,५०० रुपये होते. ४ रोजी सकाळीच ८०० रुपयांची वाढ होऊन भाव ७०,३०० रुपयांवर पोहोचले. याशिवाय चांदीचे भावही प्रतिकिलो १,१०० रुपयांनी वाढून ७९,८०० रुपयांवर गेले. मार्च महिन्यात सोन्याचे दर ५,३०० रुपयांनी वाढले, तर आता एप्रिल महिन्यात चार दिवसातच १,३०० रुपयांची वाढ झाली. दरवाढीनंतरही गुंतवणूकदार सोने मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.