नागपूर : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने आणि चांदीच्या भावात दिवसभरात चारदा चढउतार दिसून आली. शनिवारच्या तुलनेत सोमवारी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ६०० रुपये आणि प्रति किलो चांदीत १७०० रुपयांची वाढ झाली. अक्षय्य तृतीयेआधी दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढत आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात सोने एक हजाराने आणि चांदीचे भाव ८०० रुपयांनी घसरले होते.
सोमवारी खुलत्या बाजारात सकाळी १० वाजता सोने २०० रुपयांनी वाढून ७१,८०० रुपयांवर पोहोचले. दुपारी १२.३० वाजता पुन्हा १०० रुपयांची वाढ झाली. सायंकाळी ५ वाजता ३०० रुपयांनी वाढून ७२,२०० रुपयांवर गेले. सायंकाळी ७ वाजता भाव स्थिर होते. याचप्रमाणे सकाळी १०.३० वाजता चांदीत तब्बल ९०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ८१,५०० रुपयांवर पोहोचली. दुपारी १२.३० वाजता ४०० रुपयांची वाढ, सायंकाळी ५ वाजता १०० रुपये आणि ७ वाजता ३०० रुपयांची वाढ होऊन भाव ८२,३०० रुपयांवर पोहोचले. अक्षय्य तृतीयेपर्यंत दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढतील, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.