नागपूर : इस्त्राइलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले पुन्हा तेज केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून समजल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचे दर वधारले आहेत. नागपुरात दोनच दिवसात सोने १६०० रुपयांनी वधारून ६० हजार आणि चांदीत १२०० रुपयांची वाढ होऊन दर प्रतिकिलो ७२,२०० रुपयांवर पोहोचले आहे. या किमतीवर ३ टक्के जीएसटी वेगळा लागतो, हे विशेष.
तसे पाहता पंधरा दिवसात सोन्याचे दर २२०० रुपये आणि चांदीचे दर १६०० रुपयांनी वाढले आहेत. १ ऑक्टोबरला सोने ५७,८०० आणि चांदीचे दर ७०,४०० रुपये होते. त्यानंतर ३ ऑक्टोबरला सोने पुन्हा ६०० रुपये आणि चांदीचे दर २ हजार रुपयांनी कमी झाले. ४ ऑक्टोबरला सोन्याचे दर पुन्हा ५७ हजारांपर्यंत कमी झाले. ६ ऑक्टोबरला त्यात १०० रुपयांची घसरण झाली. ७ रोजी पुन्हा ६०० रुपयांची घसरण होऊन सोने ५७,३०० रुपयांपर्यंत कमी झाले.
७ ऑक्टोबरनंतर दरवाढ होण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळू लागतात स्थानिक सराफांनी ग्राहकांनी सोने खरेदीचे आवाहन केले होते. १० रोजी सोने ५८ हजार, ११ रोजी ५८,२०० रुपये, १२ रोजी ५८,५०० रुपये, १३ रोजी ५९,३०० रुपये आणि १४ ऑक्टोबरला १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर पुन्हा ६० हजार रुपयांवर पोहोचले तर प्रतिकिलो चांदी ७२,१०० रुपयांवर स्थिरावली. दरवाढीमुळे सराफांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.