लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमध्ये निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोने-चांदी खरेदीत वाढ झाली असून सराफांमध्ये उत्साह आहे. पंधरा दिवसांपूर्वी ५१ हजारांवर पोहोचलेले दहा ग्रॅम सोन्याचे भाव ४८,५०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. याशिवाय चांदी प्रति किलो ७५ हजारांहून ७१ हजार रुपयांपर्यंत उतरली आहे. निर्बंध हटल्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूला झळाळी आली आहे.
६ एप्रिलपासून निर्बंध लागू झाल्यानंतर सोने ३ हजार ५०० रुपये आणि चांदीत तब्बल ७ हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या संकटाने बाजारपेठेत अस्थिरता आल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांची सोनेखरेदी वाढली आहे. सामान्य लोक ५ हजारांपासून गुंतवणूक करीत आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात दहा ग्रॅम सोने ५६ हजारांवर गेले होते. त्यानंतर भाव कमी झालेत. यावर्षीही दोन महिने सराफा दुकाने बंद असतानाही कमोडिटी बाजार सुरू होता. त्यामुळे बाजारात उलाढाल व्हायची. याशिवाय आंतरराष्ट्रीय किमतीनुसार देशात दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत चढ-उतार सुरूच होता. या काळातही अनेकांनी सोने-चांदीची खरेदी केली. सराफांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात सोन्याचे भाव २४ हजार रुपये होते. आता भाव दुप्पट झाले आहेत.
सोन्याचे भाव ५० हजारांच्या आत आहेत; पण चांदीचे भाव वाढतच आहेत. जवळपास दोन महिन्यांत चांदीचा भाव साडेसात हजारांनी वाढला आहे. नागपूर सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, भाव स्थिर असल्याने बाजारात ग्राहकांची चहलपहल आहे. सध्या लग्नाचा सिझन नाही, त्यानंतरही अनेक जण दागिन्यांचे बुकिंग करीत आहेत. पुढे लोकांची गुंतवणूक वाढल्यास व्यवसायाला गती मिळेल. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे. दुकानांची वेळ वाढविल्यास बाजारात गर्दी होणार नाही, असे कावळे यांनी स्पष्ट केले.