नागपूर : केंद्रीय सीमाशुल्क विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी पहाटे अटक केलेल्या आरोपीला गुरुवारी सकाळी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. सोने तस्करी हा आरोपीचा अजामीनपात्र गुन्हा असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.अर्शद खान (२४) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानचा रहिवाशी आहे. तो नोकरीकरिता जेद्दाह येथे गेला होता. त्याचा तीन वर्षांचा व्हिसा संपला होता. नागपुरातून राजस्थान राज्यातील मूळ गावी सोने नेणे शक्य असल्यामुळे त्याने सोने तस्करीसाठी नागपूरची निवड केल्याची माहिती आहे.
जबाब घेण्यासाठी आरोपीला सकाळी कार्यालयात आणले होते. चौकशीअंती त्याला सायंकाळी ५.३० वाजता अटक केली. गुरुवारी त्याला सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. आरोपी सोने नागपुरात कुणाला देणार होता वा राजस्थानला नेणार होता, हे चौकशीनंतर कळणार आहे. त्याकरिता आम्ही रिमांडची मागणी करणार असल्याची माहिती केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त/एआययू अविनाश पांडे यांनी दिली.
प्रवाशाने पेस्ट स्वरूपातील १ कोटी ६५ लाख रुपये किमतीचे जवळपास २.७ किलो सोने सात पॅकेटमध्ये जीन्स पॅन्टच्या आतील भागात स्टीच करून लपवून ठेवले होते. हा प्रवासी कतार एअरवेजच्या विमानाने मंगळवार, ९ मे रोजी पहाटे २:३० वाजता दोहा येथून नागपुरात आला होता.