नरेश डोंगरे
नागपूर : बांगलादेशी तस्करांशी संधान साधून देशातील विविध प्रांतांत गोल्ड स्मगलिंग करणाऱ्या सोनेरी टोळीला डीआरआयने जेरबंद केल्यानंतर या नेटवर्कची पाळेमुळे खोदण्याचे काम जोरात सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर, गोल्ड स्मगलर्सशी कनेक्ट असलेले 'हवाला'वालेही तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याची जोरदार चर्चा संबंधित वर्तुळात केली जात आहे. परिणामी 'हवाला'वाल्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती आहे.
देशभरात विदेशी सोन्याच्या तस्करीचे नेटवर्क चालविणाऱ्या 'सोनेरी टोळी'चा पर्दाफाश महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केला असून, अलीकडच्या काळातील सर्वात मोठी विदेशी सोने जप्तीची कारवाई १३ आणि १४ ऑक्टोबरला केली. विशेष म्हणजे, या कारवाईची सुरुवात डीआरआयने नागपुरातून केली. सोनेरी व्यवसायाशी संबंधित एका बड्या प्रस्थासह नागपुरातील चार आणि त्यानंतर वाराणसी तसेच मुंबई येथील सात असे एकूण ११ जण जेरबंद करण्यात आले. या सर्वांकडून तब्बल १९ कोटी रुपयांची ३१.७ किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. हे सोने विदेशातून आणले गेल्यामुळे त्यांची अत्यंत गुप्त मात्र कसून चाैकशी केली जात आहे.
दरम्यान, या कारवाईने 'सोन्याचा काळा व्यवहार' करणारेच नव्हे तर त्यांच्याशी कनेक्ट असलेल्या हवाला व्यावसायिकांनाही जबर हादरा बसला आहे. कारण सर्व अवैध व्यवसायाची लेणदेण हवालाच्या माध्यमातून होते आणि नागपुरातून रोज कोट्यवधींचा हवाला व्यवसाय केला जातो. त्यामुळे त्यांचे धागेदोरे सर्वच तस्कर आणि अवैध धंदेवाल्यांशी जुळले आहेत.
सध्या सुरू असलेले नवरात्र, पुढ्यात असलेला दसरा आणि त्यानंतर दिवाळी या मोठ्या सणांमुळे अन्य व्यवसायांच्या तुलनेत आतबट्ट्याचा व्यवसाय करणारी मंडळी पुढे असते. नागपुरातून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हवाला होतो. मात्र, मोठी कारवाई होत नसल्याने हवालावाले चांगलेच निर्ढावले आहेत. त्यांच्याकडून रोज लाखो करोडोंची रक्कम बेमालूमपणे इकडून तिकडे केली जाते. बहुतांश माल रेल्वेनेच आणला-पाठविला जातो. डीआरआयने अत्यंत काैशल्याने गोल्ड स्मगलिंगचा पर्दाफाश केल्यानंतर हवालावाले दणकले आहे. कारण हवालासुद्धा आता रडारवर आल्याची संबंधित वर्तुळात जोरदार चर्चा आहे. परिणामी हवाला वर्तुळात तीव्र अस्वस्थता पसरली आहे.
अशी होते धूळफेक!
हवालावाले कधी औषधांच्या बॉक्स (खोक्यात) तर कधी साैंदर्यप्रसाधनांच्या बॉक्समध्ये, कधी चॉकलेट, स्वीट बॉक्स तर कधी सोनपापडीच्या पिंपामधून कोट्यवधींच्या रकमेची हेरफेर करतात. काही वर्षांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारे सोनपापडीच्या पिंपातून लाखोंची रोकड बाहेर पाठविली जात असताना पोलिसांनी ती पकडली होती. या कारवाईनंतर हवालावाल्यांनी प्रचंड सतर्कता बाळगत हा व्यवहार वेगळ्या पद्धतीने सुरू ठेवला.