मणप्पुरम गोल्डमधील दरोडा : पोलिसांची चमू कोलकाताला रवाना नागपूर : मणप्पुरम गोल्ड कार्यालयावर शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकून ३१ किलो सोन्याचे दागिने व ३ लाख रुपये लुटण्यात आले. हा दरोडा सुबोध सिंह गँगच्या सदस्यांनी टाकला होता. त्यांनी आपल्या हिश्श्यातील सोने नेपाळची राजधानी काठमांडू येथे विकल्याची माहिती पुढे आली आहे. कोलकाता व विशाखापट्टणम पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सुबोध सिंह टोळीतील अनुराग कुमार सिंह ऊर्फ जॅकी आणि सन्नी कुमार सिंह हे दोन सदस्य हाती लागले आहेत. ते विशाखापट्टणम येथील फायनान्स कंपनी व बँक लुटण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी त्यांना पोलिसांनी अटक केली. सन्नी हा जरीपटका येथील मणप्पुरम गोल्ड कार्यालयातील दरोड्यातही सहभागी होता. त्यांना आणण्यासाठी शहर पोलिसांची एक चमू कोलकाताला रवाना झाली आहे. आरोपींना येथे आणून विचारपूस केल्यावरच या दरोड्यातील खरा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. २८ सप्टेंबर रोजी टाकण्यात आलेल्या या दरोड्यानंतर पोलीस सुबोध सिंह व त्याच्या सदस्यांच्या शोधात होते. यासाठी ते अनेकदा बिहारलाही जाऊन आले. परंतु त्यांना कुठलाही पुरावा सापडला नाही. सूत्रानुसार मणप्पुरम गोल्ड कार्यालयावरील दरोड्यात सुबोध सिंह सोबत सन्नी सिंह, धर्मवीर सिंह, मनीष सिंह आणि त्याचे इतर दोन साथीदारांचा समावेश होता. त्यांनी कोलकातामध्ये सुद्धा दरोडा टाकला होता. त्यामुळे कोलकाता पोलीसही त्यांच्या शोधात होते. कोलकाता पोलिसांनी सखोल चौकशी करीत त्यांचे ‘लोकेशन ’मिळविले. यानंतर त्यांना पकडले. कोलकाता व विशाखापट्टणम पोलिसांनीआतापर्यंत सन्नी सिंह, अनुराग सिंह, ऊर्फ जॅकी, वीरेंद्र सिंह, धर्मवीर सिंह आणि ईश्वर प्रताप सिंहला पकडले आहे. या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी शहर पोलिसांनी न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट मिळविला. रात्री उशिरा पोलिसांची एक चमू कोलकातासाठी रवाना झाली. मिळालेल्या माहितीनुसार सन्नी सिंहचे म्हणणे आहे की, मणप्पुरम गोल्ड कार्यालयावर दरोडा टाकल्यानंतर तो उत्तर प्रदेशातील वाराणसीला गेला. ते तिथे पोहोचताच त्यांच्या नालंदा येथील चंडी गावात पोलीस आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ते थेट गावाला गेले नाही. काही दिवसानंतर त्यांनी गावात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर सोन्याचे हिस्सेवाटे करण्यात आले. आपल्या हिश्श्यातील दागिने घेऊन तो नेपाळची राजधानी काठमांडूला गेला. तिथे दागिने विकले. इतर लोकांबाबत त्याला माहीत नाही. सन्नीच्या माहितीवर पोलिसांचा विश्वास बसलेला नाही. कारण नेपाळमध्ये त्याला नेपाळी मुद्रा मिळाली असेल. भारतीय रुपयाच्या तुलनेत तेथील मुद्रा कमी किमतीची आहे.(प्रतिनिधी)
नेपाळमध्ये विकले सोने
By admin | Published: February 11, 2017 2:26 AM