धनत्रयोदशीला ६० कोटींच्या सोन्याची विक्री : दुचाकी, चारचाकी, कपडा बाजारात गर्दीनागपूर : धनत्रयोदशीला सोन्याचा दर ३० हजारांवर गेला असला तरी त्याच्या विक्रीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या दिवशी सोन्याच्या विक्रीमध्ये तब्बल ३० टक्क्यांची वाढ होऊन जवळपास २०० किलो अर्थात ६० कोटी आणि १० कोटी रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तूंची विक्री झाल्याची माहिती सोने-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. सोन्याच्या विक्रीत नाण्यांचे योगदानसोन्याच्या एकूण विक्रीमध्ये नाण्यांच्या विक्रीचेही मोठे योगदान आहे. दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने ग्राहकांनी लग्नाचीही याचवेळी खरेदी केली. तुलनात्मकरीत्या यावर्षी शोरूममध्ये प्रचंड गर्दी असल्याचे रोकडे शोरूमचे संचालक राजेश रोकडे यांनी सांगितले.सोन्याच्या आभूषणांसह हिऱ्यांच्या दागिन्यांचीही मोठी खरेदी केली जात आहे. हिऱ्याच्या हलक्या वजनातील दागिन्यांना चांगली मागणी असून विक्रीमध्ये जवळपास ५० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. तसेच सोन्याची नाणी आणि बिस्किटांचीही खरेदी करण्यात आली. शनिवार आणि रविवारीसुद्धा ग्राहक खरेदीसाठी येतील, असा विश्वास आहे. धनत्रयोदशीला प्रमुख सराफा बाजार असलेल्या इतवारी, धरमपेठसह अन्य सराफा बाजारातही मोठी उलाढाल झाल्याचे रोकडे यांनी सांगितले.
सोनेरी दिवाळी
By admin | Published: October 29, 2016 2:13 AM