१९७२ च्या भीषण दुष्काळानंतर या विभागाचे महत्त्व अधाेरेखित झाले. या दुष्काळानंतर राज्य शासनाने जागतिक बॅंकेशी करार करून अन्नधान्य उत्पादनावर भर दिला. त्यानुसार सिंचन, विहिरी, कूपनलिका आदींच्या नियाेजनात इतर विभागांसह भूजल सर्वेक्षण विभागाने माेठी भूमिका पार पाडली. अस्तित्वात असलेल्या विहिरींची सुधारणा, कूपनलिकांची निर्मिती, पंपाचे विद्युतीकरण आदी जलसिंचनाची कामे करताना भूवैज्ञानिकांचे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरले. संचालनालयाचा दर्जा मिळाल्यानंतर १९८३ पासून स्वतंत्र संशाेधन व विकास कक्षाची निर्मिती करण्यात आली. ३४ जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यालयांची निर्मिती झाली. पुढे नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने पिण्याच्या पाण्याची शाश्वती वाढविणे, सिंचनाच्या शासनाच्या वेगवेगळ्या याेजना राबविण्यात विभागाने माेलाची भूमिका बजावली. याच आधारावर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या प्रयाेगशाळांची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभागाकडे साेपविण्यात आली. सुवर्ण महाेत्सवी वर्षानिमित्त समाजामध्ये जाऊन जलजागृती उपक्रम राबविणे निश्चित केल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक सुनील कडू यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.
भूजल सर्वेक्षण विभागाचा सुवर्ण महाेत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:08 AM