आॅनलाईन लोकमतनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सुवर्ण महोत्सवाला शुक्रवार २२ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी वैज्ञानिक सत्राचे आयोजन केले आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होईल, अशी माहिती या महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ. रवी चव्हाण यांनी दिली.डॉ. चव्हाण यांनी सांगितले, १८६७ मध्ये ‘सिटी हॉस्पिटल’च्या नावाने सुरू झालेला धर्मादाय दवाखाना आज ‘मेयो’च्या नावाने विदर्भच नाही तर आजूबाजूच्या पाच राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. या संस्थेला २०१७ मध्ये ५० वर्षे झाली. या सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम २२ ते २४ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मेयोच्या माजी विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या फायद्यासोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक प्रस्ताव तयार केले आहेत. महोत्सवाचा पहिला दिवस शुक्रवारी वैज्ञानिक सत्राचे उद्घाटन महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते होईल. या सत्रात मधुमेह, उच्च रक्तदाब व संसर्गजन्य आजार यावर चर्चा करण्यात येईल. सायंकाळी रुग्णालयाच्या चतुर्थ कर्मचाऱ्यांपासून वर्ग १ चे अधिकारी मिळून आॅर्केस्ट्रा सादर करतील. शनिवार २३ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मेयोच्या परिसरात महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यापूर्वी १९६७ पासून ते आतापर्यंतचे सुमारे ५०० माजी विद्यार्थी मेयोचे माजी शिक्षक व माजी अधिष्ठात्यांना परेडच्या माध्यमातून मानवंदना देतील. या महोत्सवात सर्जिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन होईल, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.