नागपूर : १५ डिसेंबर १९७१ रोजी मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीला १५ डिसेंबर २०२१ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. वाचकप्रियतेचा हा सुवर्ण महोत्सव नागपूरसह विदर्भातील श्रद्धास्थानांमध्ये भक्तिभावाचा गजर करून साजरा करण्यात आला.
या आनंदात लोकमत परिवारासह वाचक, हॉकर्स, एजंट सारेच सहभागी झाले. विदर्भातील गावागावांत लोकमतची रांगोळी काढण्यात आली. लोकमत सुवर्ण महोत्सवाच्या आकर्षक बॉक्समध्ये ५० हजार लाडू प्रसादाचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने नागपुरातील लोकमत भवनावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई चित्त वेधून घेत होती.
श्री गणेश मंदिर, टेकडी येथे लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते खास शुद्ध देशी तुपात तयार केलेला ५० किलो बुंदीचा लाडू व सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेला अंक बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला. विधिवत आरती करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले उपस्थित होते. पटोले यांनी लोकमतच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीबाबत अभिनंदन करतानाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. समीर मेघे, आ. राजू पारवे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, लोकमत वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत टाइम्सचे संपादक एन.के. नायक, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा, मुजीब पठाण आदी उपस्थित होते.
सर्वधर्मसमभावाचा जागर श्री टेकडी गणेश मंदिर येथे ५० किलो बुंदीचा लाडू अर्पण केल्यानंतर विजय दर्डा यांनी रामदासपेठ येथील गुरुद्वारा, दीक्षाभूमी, मोठा ताजबाग, होली फॅमिली चर्च व निवासस्थानी असलेल्या जैन मंदिरांत जाऊन दर्शन घेत प्रसाद व सुवर्णमहोत्सवी अंक अर्पण केला.
रांगोळी व निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादलोकमततर्फे आयोजित रांगोळी व निबंध स्पर्धेसाठी हजारोंच्या संख्येने प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. अजूनही ओघ सुरूच आहे. लवकरच या प्रवेशिकांचे परीक्षण करून लोकमतच्या अंकात निकाल जाहीर केला जाईल.
सुवर्ण महोत्सवी चार वितरकांचा सन्माननागपूर आवृत्तीच्या स्थापनेपासून ते सुवर्ण महोत्सवाचा सोहळा साजरा होईपर्यंत नागपुरात अंक वितरणाची धुरा सांभाळणाऱ्या टिळक पुतळा येथील प्रभाकर हलमारे, तुकडोजी पुतळा येथील भोजराज उरकुडे, प्रतापनगर येथील श्रीराम माटे व रामदासपेठ येथील वासुदेव भटारकर या चार प्रमुख वितरकांचा यावेळी विजय दर्डा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या चारही वितरकांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. विजय दर्डा यांनी या चारही वितरकांना यावेळी प्रसादरूपी ५० किलो लाडूच्या अग्रपूजेचा मान देत, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.