लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरिबी किंवा अभावग्रस्ततेचे जगणे इच्छाशक्ती असलेल्यांना यशापासून रोखू शकत नाही. मात्र ही अभावग्रस्त परिस्थिती वेळोवेळी परीक्षा मात्र घेत असते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३३ सुवर्णपदके प्राप्त केलेल्या सागर श्रावण गुर्वे या पॉवरलिफ्टिंग खेळाडूला अशाच परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे. ही परीक्षा आर्थिक परिस्थितीची आहे. सागरची वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग काँग्रेसतर्फे रशियाच्या चिलियाबिनसेक येथे होणाऱ्या आशिया चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. मात्र आर्थिक परिस्थिती त्याच्या मार्गात अडसर ठरली असून तो स्पर्धेला मुकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती येथे राहणारा सागर हा अत्यंत होतकरू तरुण. वडील श्रावण गुर्वे यांचे रस्त्याच्या कडेला चिकनचे दुकान आहे. आई गृहिणी आहे व आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. सागरला बारावीनंतर पॉवरलिफ्टिंग खेळाविषयी आवड निर्माण झाली. या खेळात यशस्वी होण्यासाठी त्याने कसून मेहनत सुरू केली. यादरम्यान घरच्या परिस्थितीची जाणीव त्याला होती. पदवीच्या अभ्यासासह आईसोबत भाजीपाला विकण्यापासूनचे काम करीत कुटुंबाला हातभार लावला. यावेळी आवडीच्या खेळासाठीही त्याचे परिश्रम सुरूच होते. २०१५ मध्ये तो पहिल्यांदा या खेळाच्या स्पर्धेत उतरला. सुरुवातीला अपयशच त्याच्या हाती आले. तो मात्र खचला नाही की मागे हटला नाही. आपले प्रयत्न त्याने सुरूच ठेवले. इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. मग मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर झालेल्या प्रत्येकच स्पर्धेत सागरने केवळ आणि केवळ सुवर्णपदकावरच नाव नोंदविले. सातवेळा नागपूर चॅम्पियन, पाचवेळा महाराष्ट्र चॅम्पियन आणि दोनदा तो नॅशनल चॅम्पियन ठरला आहे. २०१७ मध्ये थायलंड येथे आणि मागील वर्षी रशियाच्या मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदकाचीच कमाई केली.अतिशय शास्त्रीय व शिस्तीने पॉवरलिफ्टिंगचा सराव करणाऱ्या ‘गोल्डमॅन’ सागरला मात्र आर्थिक परिस्थितीमुळे वेळोवेळी परीक्षा द्यावी लागत आहे. येत्या जुलै महिन्यात रशियात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीही त्याला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विमान प्रवास व इतर खर्च अशी दीड लाखाची गरज आहे. यातील अर्धी रक्कम फेडरेशनतर्फे भरली जात असून, उर्वरित रक्कम सागरला येत्या ५ मेपर्यंत जमा करायची आहे.‘सागर’साठी मदतीची लाट हवी !स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कसून सराव करताना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पॉवरलिफ्टिंगमध्ये यशस्वी होण्याच्या त्याच्या स्वप्नाला अधिक बळ देण्यासाठी समाजाकडून सागरसाठी मदतीची लाट येण्याची गरज आहे.सागरला मदत करण्यासाठी दानदात्यांनी सागर गुर्वे याच्या बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक ८७७३१०३१००००२४९ या खात्यावर मदत करावी. बँक शाखेचा आयएफएससी कोड बीकेआयडी०००८७७३ हा आहे. सागरला ८८०६५३९६२५ या मोबाईल क्रमांकावरही संपर्क केला जाऊ शकतो.‘पॉवरलिफ्टिंग ऑलिम्पिया’साठीही निवडआगामी नोव्हेंबरमध्ये पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड काँग्रेसतर्फे फिनलॅन्ड येथे पॉवरलिफ्टिंग ऑलिम्पियाचे आयोजन होत आहे. त्यासाठी सागरची निवड झाली आहे. ही निवड नागपूरकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली.