लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलिसांनी सोमवारी दुपारी माजी उपमहापाैर तसेच भाजपाचे नगरसेवक दीपराज पार्डीकर यांचा मुलगा जय याच्यासह १२ जुगाऱ्यांना जेरबंद केले. यानंतर कारवाईत मोठा गोलमाल झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारवाईदरम्यान आणि नंतर पोलिसांनी अलंबिलेली भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
बांगलादेश नाईक तलाव परिसरात गणपती बोकडेच्या घरी अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा भरविला जात होता. येथे रोज मोठ्या संख्येत जुगारी लाखोंची हारजीत करीत असल्याचेही सांगितले जात होते. सोमवारी दुपारी ३.१५ वाजता पाचपावली पोलिसांनी तेथे छापा घातला. एका खोलीत ताशपत्ते खेळणारे १२ जुगारी पोलिसांना सापडले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून ९२४० रोकड अन् साहित्य जप्त केल्याचे रेकॉर्डवर दाखवले आहे.
विशेष म्हणजे, बोकडे, पार्डीकर आणि हा जुगारअड्डा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय होता. कारण बाल्या बिनेकर हत्याकांडानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कोणत्याच अवैध धंदेवाल्याची वळवळ खपवून घेणार नाही, असा खणखणीत इशारा सर्व ठाणेदारांना दिला होता. दुसरे म्हणजे, या भागातील पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनीही अवैध धंदेवाले, गुन्हेगार आणि नशाखोरांनाही वठणीवर आणण्याची भूमिका अवलंबिली आहे. अशाही स्थितीत पाचपावलीत हा अड्डा सुरू होता. तेथे कारवाई करणाऱ्या पोलिसांनी १२ जुगाऱ्यांकडून केवळ ९२४० रुपये जप्त केल्याची बाब खटकणारी ठरली आहे. कारण या जुगार अड्डयावर लाखोंची हारजीत होते अन् १० ते १५ हजार रुपयांची नाल (कट्टा) जुगार अड्डा भरविणारा कमावतो, असे सांगितले जात असताना ही मंडळी बाकीचा व्यवहार (जुगार) कॅशलेस करत होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जप्तीत पोलिसांनी मोबाइलही दाखवले नाही, त्यामुळे संशय जास्तच वाढला आहे.
दुसरे म्हणजे, पाच हजारांची दारू पकडली तरी फोटोसह बातमी छापून घेण्यासाठी प्रेसनोट व्हायरल करणाऱ्या पोलिसांनी भाजपा नेत्याशी संबंधित जुगार अड्डयावरील कारवाईच्या माहितीची प्रेसनोट कोणत्याही ग्रुपवर पोस्ट केली नाही.
एवढेच काय, माहिती कक्षाला सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळी, दुपारी आणि सायंकाळपर्यंतही कळविली नाही. त्यामुळे पोलीस प्रेसनोटमध्येही या कारवाईची माहिती आली नाही.
तिसरा सर्वांत महत्त्वाचा आणि संशयास्पद मुद्दा म्हणजे, पोलिसांनी जुगार ॲक्टनुसार कारवाई करताना ५ पेक्षा जास्त मंडळी आढळल्याने साथ रोग निवारण कायद्याचे कलम लावले की नाही, तेसुद्धा पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे या कारवाईत गोलमाल झाल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
उपायुक्तांकडून पाचपावलीत विचारणा
या सर्व संशयास्पद मुद्द्यांच्या संबंधाने पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत पाचपावली पोलिसांकडून माहिती घेतो, असे सांगितले. काही संशयास्पद आढळल्यास चाैकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.