न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम नागपुरातील सुरेंद्रगढ परिसरात आदिवासींची मोठी वस्ती आहे. गेल्या पिढ्यानपिढ्यांपासून अनेक आदिवासी कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत. गोंड मोहल्ला म्हणून हा परिसर ओळखला जात होता. मात्र या स्वातंत्र्यदिनी लोकांनी पुढाकार घेत गोंड मोहल्ल्याचे नामांतर ‘भगवान बिरसा मुंडा नगर’ असे केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आबालवृद्धांच्या उपस्थितीत नामांतराचा सोहळा पार पडला.
नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी परिपत्रक जारी करत वस्ती, रस्ते व चौकांची जातिवाचक नावे बदलण्याचे आदेश दिले होते. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात १५ ऑगस्टपूर्वी मनपाला नावे बदलायची होती. मात्र यासंदर्भात ठोस कार्यवाही होताना दिसली नाही. जनहित या स्वयंसेवी संस्थेचे संयोजक अभिजित झा यांनी यासाठी पुढाकार घेतला. झा यांच्या नेतृत्वातील जनहित टीमने परिसरातील नागरिकांशी संवाद साधत चर्चा केली. याबद्दलचे शासनाचे आदेश व जातिवाचक नावे बदलण्याची आवश्यकता लोकांना पटवून दिली. अखेर एकमताने वस्तीला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्याचा संकल्प करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी नामांतराचा सोहळा पार पडला. यावेळी जनहितचे संयोजक अभिजित झा यांच्यासह जोहार सडमाके, राहुल उईके, नितीन सडमाके, साहिल सडमाके, मनीष वाढवे, प्रवीण बैरागी, अरुण बैरागी, करीम उईके, आशिष सडमाके, दयाराम, तारसा बाई, अनिता सडमाके, ममता उईके, पिंकी उईके, चेपो उईके, मुस्कान सडमाके आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.