ठळक मुद्देतलवारीने पोट व मानेवर केले वार
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारने जात असलेल्या गोंडेगाव (ता. पारशिवनी) येथील उपसरपंचाला कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील टेकाडी शिवारात अडवून त्याचा तलवारीने वार करीत खून करण्यात आला. हा खून कोळसा चोरी आणि अवैध धंद्यातून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी त्याला दुजोरा दिला आहे. यातील आरोपी पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ ते ४.१५ वाजताच्या दरम्यान घडली.विनोद यादवराव सोमकुवर (३६, रा. पुनर्वसन कॉलनी, बोरडा रोड, न्यू गोंडेगाव, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. तो गोंडेगाव ग्रामपंचायतचा उपसरपंच होता. विनोदचा मोठा भाऊ विलास यादवराव सोमकुवर (३८) याचा डुमरी (ता. पारशिवनी) शिवारातील अण्णामोड परिसरात ढाबा आहे. विनोद सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या एमएच-४०/एआर-२८४१ क्रमांकाच्या कारने गोंडेगावहून डुमरी येथील ढाब्यावर जात होता. तो नागपूर-जबलपूर महामार्गावर पोहोचताच काहींनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली.दरम्यान, त्यांनी विनोदची कार टेकाडी शिवारातील जुन्या बंद असलेल्या टोल नाक्याजवळ अडविली. आरोपींनी कारवर तलवारीने वार करीत त्याला बाहेर खेचले आणि त्याच्यावर तलवारीने वार केले. मान व पोटावर सपासप वार करण्यात आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तो गतप्राण होताच आरोपींनी वाहनासह पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शिवाय, घटनास्थळावरून तलवारीची म्यान जप्त केली. या टोल नाक्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलीस त्या कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.तडीपारीचा प्रस्ताव प्रलंबितविनोद सोमकुवर हा अवैध धंद्यांमध्ये लिप्त होता. त्याच्या विरोधात कन्हान पोलीस ठाण्यामध्ये कोळसा चोरी आणि हाणामारीचे डझनभर गुन्हे नोंदविले आहेत. त्याचा उपद्रव वाढल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी विनोदच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो तीन महिन्यांपूर्वी रामटेकचे उपविभागीय अधिकारी (महसूल) राम जोशी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. हा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयात निर्णयाधीन होता.