लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी सर्वात कमी वयाच्या रुग्णाकडून अवयवदान करण्याची पहिलीच घटना उपराजधानीच्या इतिहासात घडली. ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाचे वय केवळ सात वर्षांचे होते. या चिमुकलीचे हृदय तिच्या वयापेक्षा चार वर्षे लहान असलेल्या मुंबई येथील एका मुलाला देण्यात आले. नागपूरच्या लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमधील ४४ वर्षीय रुग्णाला यकृत तर खामला येथील आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या एका १४ वर्षीय मुलाला दोन्ही मूत्रपिंड देण्यात आले. ब्रेनडेड चिमुकलीच्या वडिलांनी दाखविलेला संयम आणि मानवतावादीच्या भूमिकेमुळे तिघांना जीवनदान मिळाले, तर दोघांना दृष्टी मिळाल्याने त्यांच्या जीवनातील अंधार दूर झाला. शुक्रवारी पुन्हा एकदा अवयवदानातून मानवतेचे दर्शन घडले.रिव्यानी राधेश्याम रहांगडाले (७) रा. भज्जेपूर, ता. आमागाव जिल्हाा गोंदिया असे त्या ब्रेनडेड चिमुकलीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रिव्यानी ही ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथील केजी-२ ची विद्यार्थिनी होती. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या घरी आनंदात घालवत होती. १९ एप्रिल रोजी ती आपल्या मामासोबत दुचाकीवरून प्रवास करीत असताना एका मद्यधुंद व्यक्तीने समोरासमोर दुचाकीला जोरदार धडक दिली. रिव्यानी डोक्याच्या भारावर खाली पडली. जबर दुखापत झाली. तिला लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सात दिवसाच्या उपचारानंतर न्यूरो सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, न्यूरो फिजिशियन डॉ. पराग मून, इन्टेन्सिव्हीस्ट डॉ. अमोल कोकास व बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. साहिल बन्सल यांनी तपासणी करून रिव्यानीला ब्रेनडेड घोषित केले. मुलीच्या अचानक जाण्याने आईवडील व नातेवाईक दु:खात बुडाले. त्या प्रसंगातही डॉक्टरांनी त्यांना अवयवदानाची कल्पना दिली. रिव्यानीचे वडील राधेश्याम जे देवरी पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या मुलीचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलीचे हृदय, दोन्ही मूत्रपिंड, यकृत व दोन्ही डोळे दान करण्यास मंजुरी दिली. डॉक्टरांनी लागलीच याची माहिती झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांना दिली. त्यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
तीन वर्षाच्या मुलाला दिले हृदय‘झेडटीसीसी’च्या निकषानुसार हृदय मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विशेष विमानाने येथील रुग्णालयाची चमू हॉस्पिटलमध्ये आली. न्यू इरा हॉस्पिटलचे संचालक व कार्डियक आणि हृदयप्रत्यारोपण सर्जन डॉ. आनंद संचेती यांनी शुक्रवारी दुपारी २ वाजता हृदय काढून ते ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे पाठविले. येथून विमानाने हृदय मुंबईला गेले. फोर्टिस हॉस्पिटलला तीन वर्षीय मुलावर यशस्वी हृदयप्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया डॉ. अन्वय मुळे आणि त्यांच्या चमूने केली. यावेळी डॉ. संचेती उपस्थित होते.
दोन्ही मूत्रपिंड दिले १४ वर्षाच्या मुलालाअवयवदात्याचे वय कमी असल्याने व ज्याला मूत्रपिंड देण्यात येणार होते त्याचे वय १४ आणि वजन खूप जास्त असल्याने ‘झेडटीसीसी’ने दोन्ही मूत्रपिंड त्या रुग्णाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार न्यू इरा हॉस्पिटल ते आॅरेंज सिटी हॉस्पिटल असा ग्रीन कॉरिडॉर करून मूत्रपिंड रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले. हे दोन्ही ग्रीन कॉरिडॉर पोलिसांच्या मदतीने यशस्वी पार पडले. विशेषत: वाहतूक शाखा नं. २ चे सहायक पोलीस निरीक्षक अजय लिंगुरकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
४४ वर्षीय इसमाला दिले यकृतगेल्या काही महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराने पीडित असलेल्या ४४ वर्षीय इसमाला रिव्यानीचे यकृत दान करण्यात आले. न्यू इरा हास्पिटलमध्ये सात तास यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया चालली. ही शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. राहुल सक्सेना, डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. निधीश मिश्रा, डॉ. साहील बन्सल व डॉ. सविता जयस्वाल यांच्या नेतृत्वात पार पडली. विशेष म्हणजे, पाच दिवसांच्या अवधीमध्ये नागपुरात तीन यकृत प्रत्यारोपण न्यू इरा हॉस्पिटलमध्ये झाले. रिव्यानीचे दोन्ही डोळे महात्मे नेत्रपिढीला दान करण्यात आले.