नागपूर : कोळसा मंत्रालयाने कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी कोळसा खाण अदानी पॉवरला दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मंगळवारी (दि.१३) जनसुनावणी घेणार आहे. याच दरम्यान कोळसा मंत्रालयाने जिल्ह्यातील आणखी पाच कोळसा खाणींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोळसा मंत्रालयाने अलीकडेच लिलाव होणाऱ्या खाणींची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत देशभरातील ९२ कोळसा खाणींचा समावेश आहे. त्यापैकी पाच नागपूर जिल्ह्यातील आहेत. खाण व खनिज विकास व नियमन कायद्यांतर्गत लिलाव होत असलेल्या या कोळसा खाणींमध्ये दहेगाव-झुणकी, दहेगाव-सप्तधारा या खाणींचाही समावेश आहे. या दोन्ही ‘एक्सप्लोरड’ खाणींच्या श्रेणीत येतात. यासह हिंगणा-बाजारगाव (मध्य), हिंगणा-बाजारगाव (उत्तर) आणि हिंगणा-बाजारगाव (दक्षिण) यांचा समावेश आहे. या संदर्भात डब्ल्यूसीएलचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. हे सर्व निर्णय कोळसा मंत्रालय घेतात. त्यांनाही याची जाणीव नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, अदानी यांना गोंडखैरी येथील खाण १२२.८३ कोटी रुपयांना देण्यात आली आहे तसेच चंद्रपूरची भिवकुंड खाण सनफ्लॅगला देण्यात आली आहे. अदानी यांना दिलेली खाण नागपूर शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संदर्भात १३ जूनला गोंडखैरी कॅम्पसमधील कार्ली गावातील तलावाजवळ जनसुनावणी घेण्याबाबत नोटीस जारी केली आहे.
पर्यावरणवाद्यांचा विरोध
कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्रामुळे प्रदूषण होत असल्याचे कारण देत कोराडीतील प्रस्तावित नवीन प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. विशेषतः गोंडखैरी खाण भुयारी असली तरी त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वन्यजीवांनाही याचा फटका बसणार आहे. या संदर्भात विदर्भ पर्यावरण समूहाचे सुधीर पालीवाल यांनी गावातील तलावाजवळ जनसुनावणी घेण्यावर आक्षेप घेतला आहे. नागपूर जिल्ह्याला देशातील सर्वाधिक प्रदूषित बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याला तीव्र विरोध होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.